नगरसेवकांच्या बॅगा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 04:05 PM2018-12-13T16:05:21+5:302018-12-13T16:05:25+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या ६८ नगरसेवकांची नावे गुरुवारी (दि. १३) राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध होत आहेत
अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या ६८ नगरसेवकांची नावे गुरुवारी (दि. १३) राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध होत आहेत. शिवसेना-भाजपचे नगरसेवक स्वतंत्रपणे गुरुवारीच नाशिकला हजर होणार आहेत. तिथे गटनोंदणी होण्याची शक्यता आहे. गटनोंदणी होताच सहलीवर रवाना होण्याच्या उद्देशाने नगरसेवकांनी रात्रीच त्यांच्या बॅगा तयार ठेवल्या होत्या.
महापालिकेच्या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावांची पक्षनिहाय यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शासकीय मुद्रणालयाकडे पाठविली. महापालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त एस. बी. तडवी यांनी ही यादी बुधवारी सादर केली. या राजपत्राची बुधवारीच छपाई झाली. राजपत्र १३ डिसेंबरच्या तारखेने प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या राजपत्राची प्रत गुरुवारी महापालिकेला मिळेल. मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी गटनोंदणी करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत.
गुरुवारी राजपत्र मिळताच महापालिका प्रशासनाकडून याची माहिती नाशिक येथील विभागीय आयुक्तांना पाठविली जाईल. यामध्ये महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत अवगत करण्यात येईल. त्यामुळे पुढील आठवड्यातच महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जावून चौकशी केली आहे. त्यामुळे ते नगरसेवकही नाशिकला गुरुवारीच गटनोंदणीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
४खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्ली येथून ते गुरुवारी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे ते युतीबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्यावर नाशिक येथील गटनोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रा. बेरड यांच्यासह काही नगरसेवकांनी नाशिक येथेच जाऊन गटनोंदणीची प्रक्रिया माहिती करून घेतली.
राठोड यांनी दिला बॅगा तयार ठेवण्याचा आदेश
शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांच्या बॅगा तयार करण्याचा आदेश उपनेते अनिल राठोड यांनी बुधवारी दिला. कोणत्याही क्षणी फोन येताच बॅगांसह शिवालयात या, असा आदेशच त्यांनी सोडला. गुरुवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नाशिकला जाणार आहेत. तेथूनच ते सहलीवर जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी बुधवारी रात्रीच बॅगा तयार ठेवण्याचे राठोड यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सांगितले.