दिलासा प्रकल्पांतर्गत होणार कोरोनाबाधित रुग्णांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:52+5:302021-05-07T04:20:52+5:30
कोपरगाव : दिलासा समुपदेशन प्रकल्पांतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून राहाता तालुक्यातील बाधित रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचे ...
कोपरगाव : दिलासा समुपदेशन प्रकल्पांतर्गत प्राथमिक शिक्षकांकडून राहाता तालुक्यातील बाधित रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम सुरु आहे. त्यापाठोपाठ हाच उपक्रम गुरुवारी (दि. ६) कोपरगाव तालुक्यात सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी अकरा प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात आली असून, या सर्वांना बुधवारी (दि. ५) शिर्डी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी समुपदेशन कसे करावे, या संदर्भात मार्गदर्शन केले.
शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी तसेच ‘लोकमत’चे शिर्डी प्रतिनिधी प्रमोद आहेर यांच्या संकल्पनेतून व प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने राहाता तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी १३ एप्रिलपासून थेट रुग्णांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत सुमारे २,६००पेक्षा जास्त बाधित रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले. त्याचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हाच उपक्रम कोपरगाव तालुक्यात राबविण्याचा निर्णय प्रांताधिकारी शिंदे यांनी घेतला. त्यानुसार तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, विस्तार अधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी कोपरगाव तालुक्यात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत कोरोनाबाधित रुग्णांना शुभारथी तर नातेवाईकांना शुभंकर असे संबोधले जाणार आहे. मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना औषधोपचारांबरोबरच समुपदेशनाची मात्राही देण्यात येणार आहे. सध्या रुग्णसंख्या व मृत्यूचा आलेख धक्कादायक पद्धतीने उंचावत आहे. अनेक रूग्णांच्या मनात भीती व चिंतेने घर केले आहे. त्यामुळे मनापाठोपाठ शरिराने खचून जाणारे धडधाकट रूग्ण अत्यवस्थ होत आहेत तर काहीजण दगावत आहेत. त्यात रेमडेसिविर, खाटा, ऑक्सिजनच्या कमतरतेने रुग्णांना धडकी भरत आहे. अशा रूग्णांच्या मनातील भीती काढून त्यांना दिलासा दिल्यास तब्येतीत सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे. यासाठी निवृत्ती बढे, सचिन घुसळे, चांगदेव ढेपले, बाबासाहेब काळे, मिलिंद गुंजाळ, उज्ज्वला बोरसे, सुनीता सोनवणे, शबाना तांबोळी, छाया थोरात, मकसूद शेख, आसिया शेख, आदी शिक्षक समुपदेशन करणार आहेत.
.............
एखादी व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यानंतर ती विविध चिंतेने ग्रासली जाते. त्यातून तिची प्रचंड प्रमाणात चिडचिड होणे, हतबल होणे, भीती वाटणे, इतरांना दोष देणे, प्रसंगी नैराश्य येत मानसिक स्थिती खराब होते. त्यामुळे अशी व्यक्ती एकदा मनाने खचली की, त्यातून त्याची प्रकृती आणखी बिघडत जाते. त्यामुळे अशा बाधित रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्या मनातील भीती काढून टाकल्यास या आजारातून बाहेर पडण्यास निश्चितच मदत होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समोर येतो.
- डॉ. ओंकार जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, शिर्डी.