ऑनलाईन सुनावणीतून दाम्पत्याला मिळाला घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:13+5:302021-02-09T04:24:13+5:30
पाथर्डी : व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिकेत व भारतात राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचा परस्पर ...
पाथर्डी : व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिकेत व भारतात राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचा परस्पर संमतीने होत असलेला घटस्फोट नगर येथील न्यायालयाने मंजूर केला. या पद्धतीचा जिल्ह्यातील हा पहिला निकाल दिला.
नीरज (नाव बदलले आहे) हा पाथर्डी तालुक्यातील तरूण अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत नोकरीस आहे. ठाणे येथील नीरजा (नाव बदलले आहे) या उच्चशिक्षित तरुणीशी त्याचा २०१८ साली विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. मात्र काळाच्या ओघात दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपसात चर्चा करून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्वीच नीरजा ही भारतात माहेरी आली होती. या दोघांनाही परस्पर संमतीने घटस्फोट द्यावा, असा अर्ज पाथर्डीचे वकील सचिन बडे यांनी नगर येथील न्यायालयात दाखल केला. मात्र लॉकडॉऊन असल्याने नीरजला सुनावणीच्या दरम्यान उपस्थित राहता न आल्याने खटला लांबला. मात्र त्यानंतर न्यायालयाने नीरज यास खरोखर घटस्फोट हवा असल्यास अमेरिकेत त्या आशयाचे प्रतिज्ञापत्र तयार करून ते वकील सचिन बडे यांच्यामार्फत न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले. त्यानंतर नीरज याने अमेरिकेत प्रतिज्ञापत्र तयार करून ते बडे यांच्या मार्फत न्यायालयात सादर केले. त्यानंतर नगर न्यायालयातील १४ वे सहदिवाणी न्यायाधीश पी. एम. उन्हाळे यांनी बडे यांच्या मोबाईलवरून नीरज यास व्हिडीओ कॉल केला. आपण सादर केलेले प्रतिज्ञापत्र खरे असून आपणास घटस्फोट हवा असल्याचे या सुनावणीत सांगितल्यानंतर पी. एम. उन्हाळे यांनी या घटस्फोटास मंजुरी दिली.