धाडसी शेतक-याने बिबट्याला घरात कोंडले; हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:48 PM2020-03-01T12:48:53+5:302020-03-01T12:52:52+5:30
घरात दिवसा लपून बसलेल्या बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला केला. परंतु या धाडसी शेतक-याने बिबट्याशी झटापट करून त्याला घरातच कोंडून ठेवले. ही घटना अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील मोग्रस येथे शनिवारी दुपारी घडली.
अकोले/कोतूळ : घरात दिवसा लपून बसलेल्या बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला केला. परंतु या धाडसी शेतक-याने बिबट्याशी झटापट करून त्याला घरातच कोंडून ठेवले. ही घटना अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील मोग्रस येथे शनिवारी दुपारी घडली.
कोतूळ परिसरातील मोग्रस गावातील दक्षिणेला गावापासून दीड किलोमीटर अंतरावर अंकुश दादा पाटील गोडसे यांची वस्ती आहे. तर आजुबाजूला देखील चारपाच वस्त्या आहेत. शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान अंकुश गोडसे यांच्या घराच्या पडवीतील खोलीत बिबट्या दबा धरून बसला होता. गोडसे यांनी खोलीत प्रवेश करताच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. मांडीला दोन ठिकाणी चावा घेतला. अचानक हल्ला झाल्यावर गोडसे भांबावले. त्यांनी आरडाओरडा करीत बिबट्याशी झटापट करून त्याला दूर लोटले. सावधानता बाळगत जखमी अवस्थेत खोलीचा दरवाजा बंद केला. तोपर्यंत आसपासच्या परिसरातील लोक धावत आले. जखमी गोडसे यांना कोतूळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी नासिक येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान वनविभागाचे वनरक्षक माणिक वाघ, संपत देशमुख, चंद्रकांत तळपाडे, गजेंद्र यादव, विठ्ठल पारधी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेआठ वाजता जेरबंद करीत पांगरी रोपवाटिकेत दाखल केले.