न्यायालयाचा दणका : आर्थिक अपहारात योग्य कारवाई न केल्याने जिल्हा उपनिबंधकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:29 AM2020-08-08T11:29:13+5:302020-08-08T11:30:25+5:30
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी येथील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकमंडळ यांच्यासह थेट जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधातच तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी येथील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकमंडळ यांच्यासह थेट जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधातच तोफखाना पोलीस ठाण्यात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इस्माईल गुलाब शेख (वय ७१, रा. तारकपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत लघु मध्यम व दीर्घ मुदतीत पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवल्यास व्याजासह चांगला परतावा मिळेल असे प्रलोभन ठेवीदारांना दाखविण्यात आले होते. या पतसंस्थेत इस्माईल शेख यांच्यासह अनेक ठेवीदारांनी पैसे गुंतविले. मात्र परताव्याची मुदत संपूनही बहुतांशी जणांना पैसे न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली. या आर्थिक फसवणुकीबाबत शेख यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था तथा प्रवरा नागरी सह पतसंस्था यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. यावर न्यायालयाने फिर्यादीच्या मागणीनुसार गुन्हा दाखल करून घेत हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारी तसेच याच पतसंस्थेचे नाव प्रवरा पतसंस्था असे बदलल्यानंतर या संस्थेवर कार्यरत असलेले संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक हे सहकारी संस्थेचे अधिकारी आहेत. त्यांनी मात्र आरोपींना वाचविण्यासाठी त्यांच्यावर कारवाई न करता चुकीचे कागदपत्र तयार केले आहेत. त्यांनाही सहआरोपी करावे, अशी फिर्यादीच्यावतीने मागणी करण्यात आली होती. आर्थिक अपहार प्रकरणात योग्य ती कार्यवाही न केल्याने थेट जिल्हा उपनिबंधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.