मनुष्यबळाअभावी कोविड सेंटर रखडले; रुग्णांची होतेय हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 03:58 PM2020-08-29T15:58:56+5:302020-08-29T16:03:04+5:30
अहमदनगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांसाठी येथील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांची महापालिकेत कमतरता आहे़ त्यामुळे हे दोन्ही २३० बेडचे कोविड सेंटर रखडले आहे.
अहमदनगर : शहरातील कोरोना बाधित रुग्णांसाठी येथील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांची महापालिकेत कमतरता आहे. त्यामुळे हे दोन्ही २३० बेडचे कोविड सेंटर रखडले आहे.
शहर व परिसरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांसाठी महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहासह आनंद लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याशिवाय पितळे जैन बोर्डिंगच्या इमारतीत ८० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. खाटांचीही व्यवस्था झालेली आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाने नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत सुरू असलेले १५० बेडचे सेंटर पालिकेमार्फत चालविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दिलेला आहे. सुविधांसह हे सेंटर पालिकेला मिळालेले आहे. परंतु, महापालिकेकडे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांचीच कमतरता आहे. त्यासाठी महापालिकेने मध्यंतरी आरोग्य विभागात नोकर भरतीची जाहिरात प्रसिध्द केली होती. परंतु, नोकर भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्राप्त उमेदवार हजर होत असून, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. ही प्रक्रिया लांबल्यामुळे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास विलंब होत आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी नटराजसह अन्य प्रस्तावित केविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही अधिका-यांची बैठक घेऊन नटराज हॉटेलमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. प्रशासनाकडून प्रस्तावित असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु, कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कोविड केअर सेंटर रखडले आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे.
रुग्णाच्या आत्महत्येमुळे पालिकाही सावध
शहरातील सुरभी हॉस्पिटलमधील एका रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. नटराज हॉटेलमधील कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, या घटनेमुळे या हॉटेलमधील गॅलरीला लोखंडी जाळी लावून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, हे काम पूर्ण झाल्यानंतरच तिथे कोविड केअर सेंटर सुरू होईल, असे सांगण्यात आले.
पितळे बोर्डिंगच्या इमारतीसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. नव्याने नोकर भरती करण्यात आली आहे. जसे-जसे उमेदवार हजर होतात, तसे त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहेत. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर हे दोन्ही सेंटर सुरू करण्यात येतील.
-डॉ़ अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.