गायीने दिला तीन वासरांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:47 PM2018-09-15T15:47:09+5:302018-09-15T15:47:13+5:30
अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत.
राजूर : अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत.
याबाबतची माहिती अशी, काळू भांगरे यांनी आपल्या डांगी जातीच्या गायीस कृत्रीम पध्दतीने रेतन केले होते. पशुधन पर्यवेक्षक सुनील सदगीर यांनी हे कृत्रीम रेतन केले होते. गर्भधारणा वाढीस लागल्यानंतर डॉ. सदगीर वेळोवेळी या गायीची तपासणी करत होते. दिवस पूर्ण झाल्यानंतर या डांगी जातीच्या गायीने तीन वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला. आजपर्यंत गायीने जुळ्या वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. गाय दोन्ही वेळेस एकूण पाच लिटर दूध देत असल्याचे सांगत जन्माला आलेल्या तिन्ही वासरांची चांगली वाढ होईल. आमच्या भागात गायीला तिळे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘गायीला तिळे होणे ही लाखातील एखादी घटना असते. त्यातही डांगी जातीच्या वळूचे गोठीत वीर्य यासाठी वापरण्यात आले होते. तीनही वासरांचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून या वळूच्या कृत्रीम रेतनाचा नमुना घेऊन त्यांची डी.एन. ए. तपासण्यात येणार आहेत. यामुळे डांगी जातीचे संवर्धन करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे’’ मत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ संतोष वाकचौरे यांनी दिली.