राजकीय आकसातून भाजपा तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:00+5:302021-03-31T04:22:00+5:30
अहमदनगर : भाजपाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक कोंडीबा खेडकर यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात राजकीय आकसातून खोटा गुन्हा दाखल झाला असून ...
अहमदनगर : भाजपाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक कोंडीबा खेडकर यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात राजकीय आकसातून खोटा गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा मागे घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधीक्षकांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेडकर यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई चालू असताना २८ मार्च रोजी पुन्हा खेडकर यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यातच पोस्को व ॲट्राॅसिटी कलमांतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. २८ मार्चच्या गुन्ह्यामध्ये पहिल्या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी यांनी संबंधित पीडितेवर अत्याचार केला असे नमूद आहे. पहिला गुन्हा दाखल करून घेणारे अधिकारी व दुसरा दाखल करून घेणारे अधिकारी हे एकाच पोलीस ठाण्याचे असताना व त्यांना सर्व हकीकत माहिती आहे. पहिल्या गुन्ह्यात आरोपींना अदयाप जामीन मिळालेला नाही. अशा वेळेस पहिला गुन्ह्यातील आरोपी व फिर्यादी एकत्र येऊन अत्याचार कसे करू शकतात? असा सवाल या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी आमदार मोनिका राजळे यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, दिलीप भालसिंग, महेंद्र गंधे, मोहनराव पालवे, बाबासाहेब सानप, अभय आव्हाड, संभाजी पालवे, सोमनाथ खेडकर, धनंजय बडे, संजय बडे, राहुल कारखेले आदी उपस्थित होते.
फोटो मेलवर आहे.
फोटो ओळी- भाजपाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीचे आमदार मोनिका राजळे यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.