दहिफळमधील शेतकऱ्यांविरुध्द गुन्हे
By Admin | Published: May 14, 2016 11:48 PM2016-05-14T23:48:38+5:302016-05-14T23:51:10+5:30
शेवगाव : जायकवाडी जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी अनधिकृतपणे उपसा करण्यास रोखणाऱ्या तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली
शेवगाव : जायकवाडी जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी अनधिकृतपणे उपसा करण्यास रोखणाऱ्या तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व अधिकाऱ्याच्या अंगावर व गाडीवर डिझेल टाकून जाळून टाकण्याची चिथावणी दिल्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील दहिफळ येथील संजय विश्वनाथ शिंदे यांच्यासह दहा ते अकरा लोकांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोपान घुले, शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या चराच्या कामाच्या पाहणीसाठी गेले असता दहिफळ गावाच्या शिवारात चराच्या बाजूला २०० ते २५० मीटर अंतरावर साधारण १५० ते २०० विद्युत मोटारी धरणाच्या पाण्यामध्ये टाकून काहींनी शेतीसाठी अनधिकृतपणाने पाण्याचा उपसा चालविण्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवल्याने शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यास बंदी असल्याने संबंधीत शेतकऱ्यांना या अगोदरच पाण्याचा उपसा करू नये, याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. तरीही पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकारी, शेतकऱ्यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्नात असताना दहिफळ येथील काही शेतकऱ्यासमवेत आलेल्या संजय शिंदे यांनी तुम्ही पाणी कसे बंद करता? धरणासाठी आमच्या हजारो एकर जमिनी गेल्या. आम्ही त्यासाठी त्याग केलेला आहे, असे म्हणून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी संबंधित सरकारी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
फोडलेल्या पाईपलाईनचे पंचनामे करा व संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी वीज पंपांना जोडलेल्या १० ते १५ पाईपलाईन दगड टाकून फोडून टाकल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. अधिकारी तसेच त्यांच्या वाहनावर डिझेल टाकून जाळून टाका, अशी चिथावणी दिल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर केला. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोपान घुले यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी संजय शिंदे यांच्यासह दहा ते अकरा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, दमदाटी व शिवीगाळ करणे, या आरोपावरून रितसर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या पाईपलाईन कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता दगड टाकून फोडली. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येईल.
-संजय शिंदे, शेतकरी, दहिफळ
अनधिकृत पाणी उपशाची पाहणी करण्यासाठी गेलो असता शेतकऱ्यांनीच वाद घातला. सरकारी अधिकाऱ्यावर खापर फोडण्यात अर्थ नाही. शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-दादासाहेब गिते, तहसीलदार