चार मंडळांविरुद्ध गुन्हे
By Admin | Published: September 9, 2014 11:16 PM2014-09-09T23:16:31+5:302023-09-21T15:24:17+5:30
अहमदनगर: प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याबद्दल सावेडी येथील दोन, तर माळीवाडा येथील दोन अशा चार मंडळांवर डीजेचालकांसह पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अहमदनगर: प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविल्याबद्दल सावेडी येथील दोन, तर माळीवाडा येथील दोन अशा चार मंडळांवर डीजेचालकांसह पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई झालेल्या मंडळांमध्ये शिवसेनेच्या दोन्ही मंडळांचा समावेश आहे.
शहरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये १४ मंडळे सहभागी झाली होती. १२ मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला. शिवसेनेच्या दोन्ही मंडळांनी डीजे लावून ध्वनीपातळीचे उल्लंघन केले. या प्रकरणी दोन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
माळीवाडा येथील समझोता तरुण मंडळाने डीजे लावला होता. या मंडळाने कापड बाजार, नवीपेठ, नेताजी सुभाष चौक या भागात मर्यादेपेक्षा डीजेचा आवाज वाढविला. या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अशोकराव कदम व त्यांचे डीजेचालक व मालक (नाव माहिती नाही) अशा तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेना शहर मित्र मंडळानेही कापड बाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, नेताजी सुभाष चौकात मोठ्या आवाजात डीजे वाजविला. या मंडळाचे अध्यक्ष संभाजी अशोकराव कदम यांच्यासह डीजेचे मालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सावेडीमधील मिरवणुकीमध्येही डीजेचा चांगलाच दणदणाट झाला. दोस्ती तरुण मंडळ, यशोदानगरचे अध्यक्ष मंगेश अरुण थोरात आणि डीजेचालक विकास विलास भापकर, तर गोरक्षनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष जालिंदर सुरेश शिंजे (रा. वैदुवाडी), व डीजेचालक सचिन भानुदास अकोलकर अशा चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ध्वनिपातळीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करून नागरिकांना त्रास व अडथळा होईल, असे वर्तन, गैरसोय, धोका उत्पन्न होईल अशा स्थितीत मिरवणूक काढणे, तसेच पर्यावरण कायद्याचा भंग करणे या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास खंडागळे, जगदीश पोटे, तोफखाना पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावेडी येथील चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे. (प्रतिनिधी)