मुलाला सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणा-या आईविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:04 PM2021-02-27T12:04:19+5:302021-02-27T12:12:57+5:30
मुलाला जुगार खेळताना पोलिसांनी पकडले म्हणून त्यास सोडविण्यासाठी गेलेल्या आईने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी गोंधळ घालणा-या आई विरुध्दही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे घडली.
विसापूर : मुलाला जुगार खेळताना पोलिसांनी पकडले म्हणून त्यास सोडविण्यासाठी गेलेल्या आईने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी गोंधळ घालणा-या आई विरुध्दही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे घडली.
श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडले. आरोपींपैकी संतोष सुदाम मगर याची आई बेबी सुदाम मगर यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास आरडाओरडा करून मोबाईलवर गोपनीय माहितीचे चित्रीकरण केले. पोलीस निरक्षक संपतराव शिंदे यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जुगार खेळताना सापडलेल्या मुलावर पुत्रप्रेम दाखवायला गेलेल्या आई विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदिराच्या बाजूस वडाच्या झाडाखाली जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचे पथकाने शुक्रवारी पहाटे चार वाजता त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पाच आरोपींबरोबरच ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास कारखिले यांच्या फिर्यादीवरून रामनाथ मगर, भिवसेन मगर, संतोष मगर, उमेश गोंटेे, राजू साळवे यांंच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.