साईबाबांची बदनामी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:02 AM2023-02-02T11:02:34+5:302023-02-02T11:03:07+5:30
Sai Baba: आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी(जि. अहमदनगर) : आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशज शिवाजी गोंदकर यांनी याप्रकरणी गिरधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा (हैदराबाद) यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे़.
३१ जानेवारीला दुपारी शिवाजी गोंदकर यांनी यू-ट्युबवर गिरधर स्वामी याने प्रसारित केलेला एक व्हिडीओ बघितला़ यात व्यक्तीने साईबाबांविषयी आक्षेपार्ह शब्दांत माहिती सांगितली होती. गोंदकर यांनी ही बाब तत्काळ शिर्डीचे आमदार व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर महसूलमंत्री विखे यांच्या सूचनेनुसार गोंदकर यांनी तातडीने संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
सायंकाळी उशिरा शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपी गिरधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा (हैदराबाद) यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे व धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.