४० टक्के व्याजदराने पैसे देणाऱ्या सावकारकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:47+5:302021-09-27T04:22:47+5:30
जामखेड : ४० टक्के व्याजदराने पैसे देणाऱ्या एका सावकारावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसातील ...
जामखेड : ४० टक्के व्याजदराने पैसे देणाऱ्या एका सावकारावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसातील हा दुसरा सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश अभिमान भानवसे (वय ३४, रा. रसाळनगर, नगर रस्ता, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून दीपक अशोक चव्हाण (रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रस्ता, जामखेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक अशोक चव्हाण याने १ लाख ३० हजार रूपये शहरातील रसाळनगर येथे राहणारे गणेश अभिमान भानवसे यांना दर महिना ४० टक्के व्याजाने दिले. फिर्यादीकडून बँकेचे चार धनादेश हमीपोटी घेतले. तसेच दिलेल्या पैशांच्या व्याजाच्या हप्त्याचे पैसे रोख, ऑनलाईन अशाप्रकारे घेतले. तरीही चव्हाण याने भानवसे यांना धमकी देऊन बळजबरीने दुकानात नेत व्याजापोटीच्या ४६ हजार ९९० रूपयांमध्ये ५५ इंची एलसीडी टीव्ही घेतला. याबाबत कोणाला सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी दमदाटीही केली. त्यानंतरही १५ सप्टेंबरला फोनद्वारे ऑनलाईन पैसे घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला दीपक चव्हाण याने गणेश भानवसे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. ‘तुझा नवरा कोठे गेला? त्याला माझे पैसे, त्या पैशांवरील व्याज द्यायला सांग. नाहीतर त्याला जीवे मारीन’, अशी धमकी भानवसे यांच्या पत्नीला दिली, असे भानवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.