Crime News: बसूमधून दागिन्यांचा डब्बा चोरणारी ती महिनाभरानंतर दिसली अन् फसली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 03:38 PM2022-03-07T15:38:37+5:302022-03-07T15:39:42+5:30
सुमित्रा रमेश छन्दी (३८, रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
अहमदनगर : शिर्डी ते दौंड बसने प्रवास करत असताना एक महिन्यापूर्वी दागिन्यांचा डब्बा घेऊन पसार झालेली महिला फिर्यादीला आढळून आली. फिर्यादीने खात्री करत तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी धाव घेत आरोपी महिलेला हुंडेकरी लॉन परिसरातून अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुमित्रा रमेश छन्दी (३८, रा. चिंचोडी पाटील, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी दीप्ती भास्कर लांडे (२१, रा. पद्मानगर कॉर्नर, पाईपलाईन रोड) या शिर्डी- दौंड बसने नगरकडे येत असताना त्यांच्याकडील २ लाख २३ हजार रुपये किमतीचे दागिने असलेला डब्बा चोरीला गेला. ही घटना ७ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोफखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. फिर्यादी महिला पतीसोबत हुंडेकरी लॉन येथून जात असताना त्यांना आरोपी महिला दिसली. बसमधून दागिन्यांचा डब्बा चोरणारी हीच ती महिला असल्याची त्यांची खात्री झाली. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिसांना फोन करून कळविले. तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे या पथकासह हुंडेकरी लॉन येथे दाखल झाल्या. त्यांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन विचारणा केली असता तिने चिंचोडी पाटील येथे राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी चिंचोडी पाटील गावात चौकशी केली असता आरोपी महिला तेथील नसल्याचे समोर आले. महिला आरोपीकडे अधिक चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करत आहेत.
....
बसमध्ये दागिने चोरणारी सराईत टोळी
बसमध्ये चोरी करणाऱ्या आरोपी महिलेसाेबत आणखी ६ ते ७ महिला असून, त्या एकमेकींच्या मदतीने बसमध्ये प्रवास करून चोऱ्या करत असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पोलीस अन्य महिलांचा शोध घेत आहेत.