प्रवासाची परवानगी असतानाही नायब तहसीलदारांवर गुन्हा, कर्मचारी संघटना सरसावल्या : गुन्हा मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:40 PM2020-06-11T17:40:21+5:302020-06-11T17:40:31+5:30
अहमदनगर : संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी रितसर आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी घेतली असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, त्वरित हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अहमदनगर : संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी रितसर आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी घेतली असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, त्वरित हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संगमनेरचे नायब तहसीलदार मूळचे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे पूर्ण कुटुंबीय पुण्याला राहते. ते सध्या संगमनेर तहसील कार्यालयात कोरोना योद्धा म्हणून कोरोनासंबंधित सर्व कामे करण्यासाठी कार्यरत होते. त्यांना मधुमेह व इतर व्याधी असतानाही त्यांनी कोरोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य दिले. आतापर्यंत संगमनेर अनेकदा हॉटस्पॉट झाले, अशा कठिण काळातही इतर अधिकाऱ्यांसह कदम यांनीही चोख कामगिरी बजावली.
दरम्यान, आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विश्रांतवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी दि. २८ मे रोजी रिसतर अर्ज करून तहसीलदारांकडे केली होती. त्यासाठी त्यांनी संगमनेर ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य प्रमाणपत्रही अर्जासोबत जोडले होते. या अर्जावर नायब तहसीलदार कदम यांच्यासह त्यांचा कारचालक व इतर एक असे तिघे प्रवास करणार होते. दि. २८ मे ते १ जून असा प्रवासाचा कालावधी होता. त्यावर संगमनेर तहसीलदारांनी हा अर्ज मंजूर करत कदम यांना प्रवासाची रितसर परवानगी दिलेली होती.
दरम्यान, कदम पुणे येथे जाऊन पुन्हा संगमनेरला आले. परंतु त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा पुणे गाठले. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान, त्यांच्या पासचा कालावधी शिल्लक असताना ते पुण्याला गेले की नंतर गेले, याबाबत माहिती पोलिसांकडेही नाही. पोलिसांनी फिर्यादीत ३१ मे ते ६ जून या दरम्यान त्यांनी प्रवास केला, असे मोघम म्हटले आहे.
---------
महसूल संघटना आक्रमक
आता यावर महसूल संघटना आक्रमक झाल्या असून कदम यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. कदम हे अनियंत्रित मधुमेही रूग्ण असतानाही ते चोवीस तास कार्यालयात राहून योगदान देत होते. त्यांच्यावर आधीचे उपचार पुणे येथे झालेले आहेत. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पुणे येथे जावे लागले. दरम्यान कोरोना योद्ध्यांना जिल्हा बंदीतून शिथिलता देण्याबाबत आरोग्य विभागाने परिपत्रक काढलेले आहे. असे असतानाही कोरोना योद्ध्यांवर व तेही आजारी असताना गुन्हे दाखल होत असतील तर इतर कार्यरत कर्मचाऱ्यांचेही मनोबल घसरणार आहे, असे संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
---------
कोणाच्या आदेशावरून गुन्हा
नायब तहसीलदार कदम यांनी रिसतर परवानगी घेऊन आंतरजिल्हा प्रवास केलेला आहे. तरीही त्यांच्यावर जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा संगमनेर पोलिसांनी दाखल केला. जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो लोक जिल्हाबंदीचे उल्लंघन करून दाखल झालेले आहेत. त्यात पुणे, मुंबईतून येणाºयांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेकजण जिल्ह्यात आल्यावर पॉझिटिव्ह आढळले व त्यांच्यामुळे हा संसर्ग अनेकांपर्यंत फैलावला. मग पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे का दाखल नाही केले. उलट ज्यांनी कोरोना जिल्ह्यात पसरवला त्यांचे टाळ्यांच्या गजरात अनेक ठिकाणी स्वागत झाले. मग नायब तहसीलदारांवरच पोलिसांनी कोणाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.