अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा; मुलीची सुधारगृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 02:18 PM2020-10-16T14:18:42+5:302020-10-16T14:19:37+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकणी शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा : तालुक्यातील चिखली येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकणी शुक्रवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, सोळा वर्षीय एक मुलगी आपल्या बहिणीकडे लोणीव्यंकनाथ येथे राहत होती. मागील आठवड्यात तिचे नातेवाईक असणाऱ्या दोघांनी तिला कपडे घेऊन येतो असे सांगत तिला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांनी त्या मुलीचा विवाह मढेवडगाव येथील एका तरुणाशी लावून दिल्याचे सांगितले. संबधित मुलीची बहीण व तिच्या पतीने याबाबत श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी संबधित मुलगी व तिच्या नातेवाईकांना बोलावून घेत विचारपूस केली असता मुलीने लग्न झाले नसून फक्त साखरपुडा झाल्याचे लेखी लिहून दिले. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या मुलीस नगर येथील शासकीय बाल सुधारगृहाकडे रवाना केले. तिथे त्या मुलीचे समुपदेशन करण्यात आले. अधिक माहिती दरम्यान त्या मुलीने बालकल्याण समितीसमोर आपला साखरपुडा नाही तर विवाह झाल्याचे सांगितले. चाईल्डलाईन या संस्थेचे प्रवीण कदम , पूजा पोपळघट यांनी फिर्यादी यांच्यासमवेत पोलीस ठाणे गाठले. फिर्याद दाखल केली. विशाल जगन्नाथ माने (रा.मढेवडगाव), सागर काळे, शीतल सागर काळे (रा.काळेवाडी, ता. नगर), दत्तात्रय बाबा झेंडे (रा.चिखली) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|