अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या तिघांविरुध्द गुन्हा; ट्रॅक्टरसह बुलेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:59 PM2020-08-07T17:59:49+5:302020-08-07T18:00:36+5:30
ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर : ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळुची अवैधरित्या वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट हे दुचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरूवारी (७ आॅगस्ट) रात्री एक वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कैलास राजाराम कासार (वय ४१, देवाचा मळा, संगमनेर), संदीप सखाहरी गुळवे (वय २७), दीपक बाळासाहेब शिरतार (वय २४, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना वेल्हाळे गावच्या शिवारातील महादेव मंदिराजवळ विना क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह आढळून आला. या ट्रॅक्टरच्या चालकाला त्यांनी थांबवित ट्रॉलीमध्ये पाहिले असता त्यांना वाळू आढळून आली. उपविभागीय पोलीस अधिकारी पंडीत यांनी शहर पोलिसांना सदर ट्रॅक्टर चालक व त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॉलीतील एक ब्रास वाळू व बुलेट (एम. एच. १७, ए. व्ही. ५०५०) असा एकूण ३ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला ट्रॅक्टर, ट्रॉली व बुलेट तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संदीप बोटे करीत आहेत.