अंधश्रद्धेप्रकरणी न्यायाधीशासह विश्वस्तांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:38 AM2021-02-06T04:38:50+5:302021-02-06T04:38:50+5:30
मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरण्यात आली व त्यावरील पूजाअर्चेसाठी २५ लाख ...
मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्णयंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरण्यात आली व त्यावरील पूजाअर्चेसाठी २५ लाख रुपये पंडिताला देण्यात आले, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ६ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने नगरच्या पोलीस अधीक्षकांकडे ७ मार्च २०१७ रोजी तक्रार करून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, तो गुन्हा आजतागायत दाखल झाला नव्हता. कारवाई होत नसल्याने देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना ‘अंनिस’ने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करा, असा आदेश न्यायालयाने ३ फेब्रुवारीला दिला.
त्यानुसार अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, बाबा अरगडे, ॲड. रंजना गवांदे, डॉ. प्रकाश गरुड, अर्जुन हरेल यांचे निवेदनच फिर्याद म्हणून दाखल करून घेण्यात आले. यात अविनाश पाटील हे फिर्यादी असून, तत्कालीन जिल्हा न्यायाधीश न्हावकर यांच्यासह इतर विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपवनसंरक्षक असे पाच पदसिद्ध तर प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी नियुक्त केलेले इतर दहा असे एकूण पंधरा विश्वस्त कार्यरत असतात.
..........
या कलमांतर्गत गुन्हा
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम २०१३, फसवणूक, कटात सहभाग, फौजदारीपात्र न्यासभंग, लोकसेवकाने अथवा बँक व्यवसायी, व्यापारी आदींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...................
आरोपींची संख्या मोठी
या गुन्ह्यात न्यायाधीश न्हावकर यांच्यासह इतर विश्वस्तांना आरोपी करण्यात आले आहे. हे सोने पुरताना सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना मजुरी म्हणून २४ लाख ८५ हजार रुपये व १ किलो ८९० ग्रॅम सोने विनानिविदा देण्यात आले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. वास्तुविशारद रवींद्र शिंदे यांनी सुवर्णयंत्रांबाबतचा प्रस्ताव देवस्थानला दिल्याचे ठरावांमध्ये दिसते. सुवर्णयंत्रांवरील मंत्रोच्चारासाठी गोरचन, कस्तुरी यांसारख्या महागड्या जिनसा वापरण्यात आल्या आहेत. त्या कोठून पैदा झाल्या? हीही बाब या तपासात महत्त्वाची मानली जाते. गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.