शेवगावात अनधिकृत नळजोडणी अधिकृत न केल्यास फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:25+5:302021-02-12T04:19:25+5:30
शेवगाव : शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, मालमत्ताकर, कोलमडलेले पाणीनियोजन, प्लास्टिकबंदी, स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्नांच्या सोडवणुकीस भर देणार आहे, अशी ...
शेवगाव : शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, मालमत्ताकर, कोलमडलेले पाणीनियोजन, प्लास्टिकबंदी, स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्नांच्या सोडवणुकीस भर देणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे प्रशासक प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली. अनधिकृत नळजोड सात दिवसांत अधिकृत न केल्यास दंडात्मक कारवाई अथवा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदभार घेतल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील मूलभूत सर्वच विषयांबाबत काय कार्यवाही करणार, याबाबत भूमिका मांडली. केकाण यांनी शहरात फेरफटका मारून येथील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
कामगारांचे थकीत वेतन, विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ करणे गरजेचे आहे, यासाठी विशेष प्रयत्न करताना, सातबारा ऑनलाइन करण्यात आला आहे. मालमत्ताकर थकबाकी आहे, अशा नागरिकांना सातबारा मिळणार नाही. तसेच कर थकबाकी असलेल्या विविध संस्था, नागरिकांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगत केकाण म्हणाले, थकबाकी संस्थांमध्ये वीजवितरण कंपनी, बाजार समिती, मोबाइल टॉवर, मंगल कार्यालय, हॉटेल व्यावसायिक, जिनिंग प्रेसिंग आदींचा समावेश आहे. संबंधितांनी वेळेत थकबाकी न भरल्यास कारवाई करणार आहे.
अनधिकृत नळजोडणी असलेल्यांनी सात दिवसांत ते अधिकृत करून न घेतल्यास ते तोडून दंडात्मक कारवाई करणार आहे. वेळप्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील अतिक्रमणे लवकरच काढण्यात येतील. आठवडाबाजार जागेचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन शहरातील नागरिकांना लवकरच चार दिवसांनी वेळेवर पाणी कसे देता येईल, यासाठी नियोजन केले जाईल. शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने प्लास्टिकबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असून प्लास्टिक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
---
प्रत्येक दुकानात हवेत दोन डस्टबिन
शहरातील सर्वच दुकानदारांनी दुकानात दाेन डस्टबिन ठेवावे. ओला व सुका कचरा रस्त्यावर न फेकता दोन वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये टाकावा. येत्या १५ दिवसांत दुकानात डस्टबिन न दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे केकाण यांनी सांगितले.
-----
थकबाकी न भरल्यास चौकातील फलकावर नावे...
मालमत्ताकर थकबाकी वसुलीसाठी चार करनिरीक्षकांना २१ प्रभाग वाटून देत त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी दिली आहे. करनिरीक्षकांना वसुलीचा अहवाल दररोज सायंकाळी सादर करणे बंधनकारक आहे. संबंधितांनी थकबाकी लवकर न भरल्यास संबंधितांची नावे चौकात फलकावर लावली जाणार आहेत, असे केकाण यांनी सांगितले.