ढगाळ-पावसाळी वातावरणाने रबी पिकांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:32+5:302021-01-09T04:16:32+5:30
पारनेर : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्याने गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, पिके संकटात सापडली ...
पारनेर : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण असल्याने गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, पिके संकटात सापडली आहेत. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे तालुका कृषी विभागाने कीडरोग नियंत्रण मोहीम सुरू केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड व ‘आत्मा’चे देवेंद्र जाधव यांनी दिली.
गेल्या तीन- चार दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, ज्वारीवर वेगवेगळे कीडरोग येऊ शकतात. त्यामुळे पिकांवर खालील पद्धतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
हरभरा (फुलोऱ्यांच्या अवस्था)- ढगाळ हवामान व हलक्या पावसाच्या येण्याची शक्यता असल्याने
जिरायती हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.
शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच एच.एन.पी.व्ही. या विषाणूची १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ज्या ठिकाणी जिरायती हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून येत असेल तर इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के दाणेदार ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे (एकरी २०० लिटर पाणी).
कांदा- ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कांद्यावर फुलकिडे व करपा आढळून आल्यास डायमेथोएट ३० ईसी. १५ मिली किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मिली. अधिक मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १० मिली अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारणी करावी. कांद्याचे अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झफ्लोअसेन २३.५ टक्के ईसी ०.७५ मिली अधिक क्युझोलफॉप इथाइल ५ टक्के ईसी १ मिली. या तणनाशकांची प्रति लिटर पाण्यातून लागवडीनंतर २५ दिवसांनी एक फवारणी आणि ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
गहू (फुटवे फुटण्याची अवस्था) - मावा, तुडतुडे या किडींच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसान पातळी दिसून येत असल्यास १ ग्रॅम थायामिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
----
ज्वारीबाबत अशी घ्या काळजी..
ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ४ ग्रॅम इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मावा व चिकटा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट ३० ईसी. १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पाण्यात फवारणी करावी.