नगर तालुक्यावर आता पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:18+5:302021-05-13T04:20:18+5:30
केडगाव : एकीकडे कोरोनाने नगर तालुक्याला नको नकोसे केलेले असताना आता तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात सध्या ...
केडगाव : एकीकडे कोरोनाने नगर तालुक्याला नको नकोसे केलेले असताना आता तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात सध्या चार गावांत टँकर सुरू झाले असून, आणखी सहा गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे. घोसपुरी पाणी योजनेपुढे तांत्रिक अडचणी वाढत असून, बुऱ्हाणनगर पाणी योजना आर्थिक संकटात सापडली आहे.
तालुक्यात कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले असताना आता उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईचेही संकट वाढत चालले आहे. तालुक्यात मागील वर्षी सरासरीच्या १८५ टक्के विक्रमी पाऊस पडला तरी काही गावे सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तालुक्यात सध्या सांडवे, मदडगाव, बाळेवाडी आणि दश्मीगव्हाण या चार गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने या गावात तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. आता भातोडी, ससेवाडी, इमामपूर, कोल्हेवाडी, बहिरवाडी, कौडगाव या सहा गावांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. या गावांनी टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत.
घोसपुरी पाणी योजना व बुऱ्हाणनगर पाणी योजना सध्या सुरळीत सुरू असल्या तरी योजनांपुढील अडचणी कमी झालेल्या नाहीत. घोसपुरी पाणी योजनेपुढे तांत्रिक अडचणी व मनुष्यबळाची अडचण वाढली आहे. योजनेचे काही कर्मचारी कोरोनाने बाधित आहेत. तसेच घोसपुरी योजनेचा पाणी उपसा करणारा पंप कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या ३० टक्के पाण्याची आवक कमी झाली आहे. १ लाख ६५ हजार लिटर पाण्याची गरज असताना पंप नादुरुस्तीमुळे केवळ १ लाख लिटर पाणी मिळत आहे. याचा परिणाम पाणी वितरणावर होत आहे. योजना समितीचे अध्यक्ष संदेश कार्ले यांनी पंप दुरुस्त करण्याबाबत पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. बुऱ्हाणनगर पाणी योजनेकडे महावितरण व पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची बाकी आहे. वसुलीत अडचण येत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे.
--
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या गावांना पहिल्या टप्प्यात टँकर मंजूर केले आहेत. आणखी प्रस्ताव येत आहेत. आम्ही टंचाई आराखडा तयार केला आहे. वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन पुरवणी आराखडा तयार केला आहे.
-सुरेखा गुंड,
सभापती, पंचायत समिती, नगर
---
इमामपूर गावामध्ये डोंगर उताराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुरुवातीलाच गावच्या भूजल पातळीत वाढ होते. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या जि. प. सदस्य गोविंद मोकाटे स्वखर्चाने विहिरीत पाणी टाकून गावाची तहान भागवत आहेत. गावासाठी टँकर मंजूर होणे गरजेचे आहे.
-भीमराज मोकाटे,
सरपंच, इमामपूर
---
टँकर तत्काळ मंजूर होणे गरजेचे आहे.
इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या तिन्ही गावांची आज पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याचे टँकर मंजूर होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीला विलंब झाला आहे. पिंपळगाव माळवी तलावातून पाणी आणण्यासाठी बहिरवाडी व ससेवाडी गाव संयुक्तपणे प्रयत्न करत आहे.
-राजेंद्र दारकुंडे,
तालुका उपाध्यक्ष, भाजप, नगर
---
१२ बहिरवाडी तलाव
बहिरवाडी येथील कोरडाठाक पडलेला वाकी तलाव.