पोलिसांवरील टीकेचा कामगिरीवर परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:16+5:302021-03-14T04:20:16+5:30
श्रीरामपूर : जिल्ह्यातील रेखा जरे व गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली. मात्र हा आमच्या ...
श्रीरामपूर : जिल्ह्यातील रेखा जरे व गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली. मात्र हा आमच्या कामकाजाचा भाग असून अंगावर वर्दी घातल्यापासूनच या गोष्टी स्वीकारण्याची तयारी असते. टीकेमुळे अनेकदा वाईट वाटते. मात्र त्यामुळे मूळ कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ देत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.
पाटील हे हिरण हत्याकांडाची माहिती देण्यासाठी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. गेली अनेक महिने पसार असलेला रेखा जरे खुनातील सूत्रधार बाळ बोठे तसेच गौतम हिरण हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या अधिवेशनातही भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी नेत्यांनी पोलिसांच्या कामकाजावर आरोप केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्यात लक्ष्य करण्यात आले. शनिवारी बाळ बोठे यांना करण्यात आलेली अटक व हिरण हत्याकांडाचा पर्दाफाश झाल्यानंतर या टीकेबाबत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावर ते मनमोकळेपणाने बोलले.
पाटील म्हणाले, सेवेत रुजू झाल्यापासूनच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून टीकेला सामोरे जावे लागेल याची जाणीव आहे. कारण पोलिसांकडे पाहण्याची समाजाकडे एक पद्धती असते. प्रत्येक जण एखाद्या गुन्ह्याविषयी काही तर्क मांडत असतो. काही निष्कर्ष काढले जातात. मात्र या सर्व बाबींचा कामगिरीवर परिणाम होतो कामा नये, याची खबरदारी घेतली जाते.
अनेकदा गुन्हा घडल्यानंतर काही तासांत छडा लावला जावा, अशी मानसिकता असते. तपास लागला नाही तर त्यावर आंदोलनांच्या रूपाने प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळत नाही. प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षीदार नसतात. त्यामुळे गुन्ह्याची तातडीने उकल होत नाही. त्यासाठी काही अवधी खर्च होतो, असे मनोज पाटील म्हणाले.
बेलापूर येथील गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरण हे आव्हानात्मक होते. सीसी चित्रण अथवा इतर ठोस असे पुरावे प्रथमदर्शनी हाती नव्हते. या गुन्ह्याची स्पष्टता नव्हती, असे पाटील यांनी सांगितले.
----------