टीका करायची तर माझ्यावर करा, पण ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार मधुकर पिचड यांचा विरोधकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:56 AM2020-01-28T11:56:10+5:302020-01-28T11:57:07+5:30
तालुक्यात धरणे, रस्ते, शाळा, वीज अशा योजना आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यावर हवी तशी टीका करा. परंतू माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार. त्यांची बदनामी मी सहन करणार नाही, असा सल्ला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांना दिला.
कोतूळ : सध्या गावागावात जाऊन ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा उद्योग काही विघ्नसंतोषी लोकांनी सुरू केला आहे. या तालुक्यात धरणे, रस्ते, शाळा, वीज अशा योजना आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यावर हवी तशी टीका करा. परंतू माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार. त्यांची बदनामी मी सहन करणार नाही, असा सल्ला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी विरोधकांना दिला.
केळी-ओतूर येथे नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती दत्ता बोºहाडे व उपसभापती दत्ता देशमुख यांचा सातेवाडी जिल्हा परिषद गट व भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी नागरी सत्कार आयोजित केला. यावेळी पिचड बोलत होते.
यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, सिताबाई गोंदके, सारिका कडाळी, उर्मिला राऊत, सीताराम भांगरे, सचिव भाऊसाहेब वाकचौरे, गिरीराजी जाधव, सीताराम देशमुख, राजेंद्र देशमुख, गणेश पोखरकर, पांडुरंग कचरे, किसन शिरसाठ, संजय लोखंडे, सोमनाथ पवार उपस्थित होते.
मी सुसंस्कृत आहे
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या कार्यक्रमात चांगली गर्दी असल्याने माजी आमदार वैभव यांचे मनमोकळेपणाचे भाषण हे फक्त विकास कामावर होते. हसत खेळत अनेक गमतीदार किस्से सांगत त्यांनी खचलेल्या कार्यकर्त्यांना हास्य संजीवनी दिल्याने आता भाऊ खुलले अशी चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी कुणावरही टीका केली नाही. मी सुसंस्कृत आहे. एवढे एकाच वाक्याने उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.