३५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:39+5:302021-03-22T04:19:39+5:30
आश्वी : संगमनेर तालुक्यातील पूर्व तसेच पठार भागातील काही गावांमध्ये शनिवारी (दि. २०) गारपीट व बेमोसमी पाऊस झाला. यामुळे ...
आश्वी : संगमनेर तालुक्यातील पूर्व तसेच पठार भागातील काही गावांमध्ये शनिवारी (दि. २०) गारपीट व बेमोसमी पाऊस झाला. यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी रविवारी (दि. २१) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ३५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेे, असे संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
खांबे गावात गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, आदींनी केली. गहू, हरभरा, कांदा, टरबूज, खरबूज याबरोबरच डाळिंब फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
-----
जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत करावी.
-सुनील जोशी, उपसरपंच, खांबे ग्रामपंचायत, ता. संगमनेर.