जामखेडच्या विकास कामांसाठी पावणेचार कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 08:36 PM2019-02-01T20:36:12+5:302019-02-01T20:36:30+5:30
सन २०१७-१८ च्या सहाय्य अनुदानांतर्गत जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग १ ते २१ मधील विकास कामांसाठी ३ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे
जामखेड : सन २०१७-१८ च्या सहाय्य अनुदानांतर्गत जामखेड नगरपालिकेच्या प्रभाग १ ते २१ मधील विकास कामांसाठी ३ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन हा निधी प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी दिली.
जामखेड नगरपालिकेतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सहा महिन्यापूर्वी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सन २०१७ -१८ मध्ये सर्वसाधारण सभेत जे ठराव मंजूर झाले, त्यासाठी निधीची आवश्यकता होती. पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे अंदाजपत्रकाप्रमाणे निधी मंजूर झाला. याबाबत सर्व तांत्रिक मंजुरी झाल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच या कामास सुरूवात होऊन शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
पावणेचार कोटीच्या निधीमध्ये राळेभात गल्ली परिसर भूमिगत गटार करणे, मार्केट कमिटी (संताजी मंदिर) जि. प. मराठी शाळेपर्यंत भूमिगत गटार, बीड कॉर्नर ते नवीन पोलीस ठाणे भूमिगत गटार, गणेश टेकाळे घर ते डॉ. झगडे रूग्णालयापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण, नवीन तहसील ते मराठी शाळा भूमीगत गटार, छत्रपती शिवाजी पेठ, महेश कलेक्शन ते आंबेडकर सर्कल सिमेंट काँक्रिटीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर ते गोरोबा टॉकीज सिमेंट काँक्रिटीकरण, बटेवाडी, जगदाळे वस्ती ते खर्डा रोडपर्यंत काँक्रिटीकरण, जांबवाडी येथील दुर्गा मंदिर ते जामखेडकडे येणारा एक कि. मी. रस्ता, लेहनवाडी येथील बाबरवस्तीपासून जामखेडकडे येणारा एक कि. मी. रस्ता डांबरीकरण, श्री मेडिकल ते महावितरण कार्यालय भूमिगत गटार व डांबरीकरण, सदाफुले वस्ती ते फुलमळा रस्ता एक कि. मी. रस्ता भरावीकरण, खडीकरण, डांबरीकरण अशी कामे या निधीतून होणार असल्याचे नगराध्यक्ष घायतडक यांनी सांगितले.