मांडीवर बसून जेवतो कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:30 AM2018-10-05T11:30:27+5:302018-10-05T11:30:32+5:30

सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे़ रोजच कोणाच्या तरी घरापुढे पितराला जेऊ घालण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसते. 

The crow sits on the loin | मांडीवर बसून जेवतो कावळा

मांडीवर बसून जेवतो कावळा

पुंडलीक नवघरे
कोळपेवाडी : सध्या पितृ पंधरवाडा सुरु आहे़ रोजच कोणाच्या तरी घरापुढे पितराला जेऊ घालण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसते. एरवी हातातील घास घेऊन पळणारा कावळा मात्र वेळेवर रूसतो अन् नाइलाजास्तव गायीला घास द्यावा लागतो़ हल्ली असे चित्र सगळीकडेच बघायला मिळते. पण लकडे बाबांची गोष्टच न्यारी. पक्वानांचे ताट हातात घेऊन ते बसले की कावळा हमखास येणाऱ तोही अगदी मांडीवर बसणार आणि ताटातील अन्नावर यथेच्छ ताव मारुन तृप्त मनाने भरारी घेणार, असे सुखद चित्र कोळपेवाडीत पहायला मिळते.
चंद्रकांत हरिभाऊ लकडे. गंध नाही, टिळा नाही़ ‘लकडे बाबा’ नावाने ते परिचित. कोळपेवाडी गावकुसाला त्यांची शेती. त्यातच वनराईने नटलेली वस्ती. या वनराईत पशु पक्ष्यांचा मुक्त संचार. लकडे बाबा सांगतात, ‘आपले सण उत्सव धार्मिक विधी हे निसर्गातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असतात. निसर्गाने, पशुपक्ष्यांनी मानव जातीवर जे उपकार केलेले असतात, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न सण, उत्सवांतून होत असतो़ कावळ्याला पितरांची उपमा त्यातूनच दिलेली आहे. पितृ पक्षात अथवा दशक्रिया विधीत अन्नदान केले जाते़ या अन्नदानावर पशुपक्ष्यांचाही अधिकार असतो़ म्हणून कावळ्याला हा मान दिला जातो़’
कावळ्यांना लागला लळा
माणसाच्या सावलीलाही भिणारा कावळा थेट लकडे बाबांच्या मांडीवर बसून ताटातील अन्न खातो़ कावळ्यांना एव्हढा तुमचा लळा कसा लागला याबाबत विचारले तर ते म्हणाले, ‘यासाठी वर्ष दीड वर्ष लागले़ विहिरीच्या कडेला एक मोठ्ठे झाड आहे़ त्यावर कावळ्याचा खोपा होता. त्यात दोन पिल्ले होती़ एक दिवस कावळा घरट्यात नसताना कोकीळने कावळ्याचे पिल्लू लोटून दिले. हा प्रकार माझ्या लक्षात आला. पिलाला स्पर्श न करता मी ते कापडी पिशवीत घालून त्याला अलगद खोप्यात सोडले. तोच हा कावळा़ त्याचे आता स्वतंत्र कुटुंब आहे. हळूहळू हे माझ्या जवळ आले. आता हे अगदी माझ्या अंगाखांद्यावर येऊन बसतात. ताटातील अन्न खातात. पण मी बाहेर असलो तरच ते माझ्या जवळ येतात़ घरात ते कधीच येत नाहीत.’

Web Title: The crow sits on the loin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.