कडक लॉकडाऊनची घोषणा होताच शहरात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:15 AM2021-05-03T04:15:28+5:302021-05-03T04:15:28+5:30
ग्रामीण भागासह नगर शहरातीही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अत्यावश्यक काम असल्याचे सांगत बहुतांश जण विनाकारण शहरात फिरताना प्रशासनाला ...
ग्रामीण भागासह नगर शहरातीही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अत्यावश्यक काम असल्याचे सांगत बहुतांश जण विनाकारण शहरात फिरताना प्रशासनाला आढळून येत आहेत. गर्दी कमी केल्यानेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता येणार असल्याने अहमदनगर महापालिकेने रविवारी रात्री बारा वाजल्यापासून १० मेपर्यंत पुढील आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध वितरण सकाळी सात ते अकरापर्यंत सुरू असणार आहे. किराणा विक्री व भाजीपाला विक्री सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच इतर आस्थापनाही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये शेतीमाल विक्रीला आणू नये, अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर झाल्याने दळण, भाजीपाला व किराणा घेण्यासाठी नागरिक रविवारी सकाळीच घराबाहेर पडले. शहरातील एकवीरा चौक, प्रोफेसर चौक, पाइपलाइन रोड डाळमंडई, दिल्लीगेट यासह इतर ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसले.
..........
अकरानंतरही मागच्या दाराने किराणा विक्री
किराणा विक्रीची वेळ सकाळी सात ते अकरा अशी आहे. अनेक किराणा दुकानदार मात्र पुढील दरवाजा बंद ठेवून मागच्या दाराने दिवसभर विक्री करतात. उपनगरातील दुकानांमध्ये मागच्या दाराने विक्री अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसते.
.......
कडक कारवाईचा इशारा
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी पुढील सात दिवस नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा थेट गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी दिला आहे.