निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 12:32 AM2016-10-26T00:32:42+5:302016-10-26T00:53:47+5:30
अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी
अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने जिल्ह्यात खाद्यपदार्थ तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा ते बारा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून २० लाख ४३ हजार ८५२ रुपयांचे खाद्यतेल, २ लाख ८ हजार रुपयांची बर्फी तर १३ हजार रुपयांचे वनस्पती तूप जप्त करण्यात आले आहे़
अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त बी़ एम़ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ दिवाळीनिमित्त मिठाई व खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते़ या काळात ग्राहकांना निकृष्ट व भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता असल्याने अन्न विभागाने जिल्हाभर तपासणी मोहीम हाती घेतली आहे़ गेल्या पंधरा दिवसांत या विभागातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली़ श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी व कर्जत येथे खाद्यतेल विक्री करणाऱ्या प्रत्येकी एका दुकानावर छापा टाकला़ यावेळी तेलविक्रीसाठी जुनेच डबे वापरण्यात येत असल्याचे तसेच खाद्यतेल निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आल्याने हे तेल जप्त करण्यात आले़ जप्त करण्यात आलेल्या तेलांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथील अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे़ नगर शहरात मिठाई विक्री करणाऱ्या एका दुकानावर छापा टाकून ३ लाख ८ हजार रुपयांची बर्फी जप्त करण्यात आली़ दुसऱ्या एका दुकानात आढळून आलेले १३ हजार रुपये किमतीचे २४० किलो वनस्पती तूपही जप्त करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)