नगर तालुक्यात मूग, सोयाबीनची लागवड वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:32+5:302021-05-17T04:18:32+5:30
केडगाव : नगर तालुक्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यात यंदा मूग व सोयाबीनच्या लागवडीत वाढ होणार आहे. ...
केडगाव : नगर तालुक्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यात यंदा मूग व सोयाबीनच्या लागवडीत वाढ होणार आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातच शेतीशाळा व बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
नगर तालुका रब्बी हंगामासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षापासून तालुक्यात खरीप हंगामाची लागवड वाढली आहे. तालुक्यात जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी आता हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेतशिवार साफ करून नांगरणी केली जात आहे. तालुक्यात यंदा मूग व सोयाबीनच्या लागवडीत वाढ होणार आहे.
फळबाग लागवडीचेही ४८० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. विविध प्रकारच्या पिकांच्या ६४ शेतकरी शेतीशाळा घेण्यात येणार आहेत. तालुक्यात सोयाबीनची ९ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होणार आहे. तसेच यंदा शेतातच बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जाणार आहे. पुढील वर्षी खरिपासाठी लागणारे ९ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जे. एस. ३३५ या वाणाचे निर्माण वापरण्यात येणार आहे.
मूग पिकांची १८ हजार हेक्टरवर लागवड होणार असून पुढील वर्षासाठी ३ हजार क्विंटल बियाणांचे शेतकऱ्यांच्या शेतावर उत्पादन करून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कपाशीची २ हजार २५० हेक्टरवर लागवड होणार असून ६ गावांमध्ये एक गाव एक पीक उपक्रम राबवून एक वाणाचा प्रसार करण्यात येणार आहे. सोयाबीन व मूग पिकांची उगवण क्षमता चाचणी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन दाखविण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. रूंद सरी वरंभा पद्धतीने ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात येणार आहे.
----
युरिया खताचा वापर कमी होणार
माती परीक्षणावर आधारित पिकांना रासायनिक खताची मात्रा देण्यात येणार आहे. त्यासाठी युरिया खताचा वापर कमी करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या वतीने तसे नियोजन करण्यात आले आहे.
--खरीप पिकांचे नियोजन असे (आकडे हेक्टरमध्ये)
तूर- ३९००, बाजरी- ११०००, मूग- १८०००, सोयाबीन- ९५००, उडीद-४७५, इतर कडधान्य-९००, भुईमुग-४७५, सूर्यफुल-१८०, कापूस-२२५०, कांदा-७०००, ऊस-५५०.
---
नगर तालुक्यात कृषी विभागाने खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा तालुक्यात मूग व सोयाबीनचे क्षेत्र वाढविण्यात आले आहे. तसेच शेतीशाळा व बीज उत्पादन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
-पोपटराव नवले,
तालुका कृषी अधिकारी, नगर