प्रतिबंधित एचटीबीटी कापूस वाणाची नगर जिल्ह्यात लागवड; विक्री, साठेबाजीस मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 03:32 PM2020-06-26T15:32:06+5:302020-06-26T15:33:10+5:30
सरकारने लागवडीसाठी बंदी घातलेल्या एचटीबीटी (जनुकीय सुधारित) या कापसाच्या वाणाची जिल्ह्यात शेतक-यांकडून लागवड केली जात आहे. या वाणाची विक्री, साठेबाजी व लागवड करण्यास मनाई असून तसे आढळल्यास कायद्यात तीन वर्षे तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
शिवाजी पवार ।
श्रीरामपूर : सरकारने लागवडीसाठी बंदी घातलेल्या एचटीबीटी (जनुकीय सुधारित) या कापसाच्या वाणाची जिल्ह्यात शेतक-यांकडून लागवड केली जात आहे. या वाणाची विक्री, साठेबाजी व लागवड करण्यास मनाई असून तसे आढळल्यास कायद्यात तीन वर्षे तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. जिल्हा प्रशासन मात्र याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक व देशी वाणांना वाव देण्याकरिता एचटीबीटी वाणाच्या विक्री व साठेबाजीवर सरकारने बंदी आणली आहे. केंद्राच्या अखत्यारितील संशोधन संस्थेने लागवडीकरिता अद्याप या वाणास परवानगी दिलेली नाही. कृषी विभागाला त्याविरोधात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी जिल्ह्यात श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यांमध्ये काही शेतक-यांनी या वाणाच्या कापसाची लागवड केली आहे.
जिल्ह्यात कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. सध्या अनेक ठिकाणी लागवडी सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी पेरणीलायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात आणखी काही क्षेत्रावर या प्रतिबंधित वाणाची लागवड होण्याची शक्यता आहे.
स्थानिक बाजारामध्ये बियाणे उपलब्ध होत नसल्याने अकोला जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने ते शेतक-यांनी मिळविले आहे. प्रशासनासमोर त्यामुळे एचटीबीटी कापसाच्या लागवडीचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शेतकरी संघटनेने १२ जूनपासून राज्यभर सविनय आंदोलन उभारले आहे. सरकारने कुठलेही निर्बंध लादू नये व शेतक-यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे बियाणांची लागवडीची मुभा द्यावी असे संघटनेने म्हटले आहे.
ं
गुजरात व तेलंगाणा राज्यात एचटीबीटी वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम आहे. तेथे या वाणाची सर्रास दुकानांमध्ये विक्री होत आहे. राज्यात मात्र त्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतक-यांच्या आर्थिक हिताकरिता आम्ही हे वाण वापरणार आहोत. त्याकरिता तुरुंगवास भोगण्याची तयारी आहे.
-अनिल घनवट,शेतकरी संघटना.
एचटीबीटी कापसाच्या लागवडीस बंदी आहे. अद्याप या वाणाची लागवड झाल्याची माहिती नाही. मात्र तसे आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
- संजय काचोळे, विभागीय कृषी अधिकारी.