नगरच्या शेतकऱ्याने केली जंगली कर्टुल्याची शेती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:00 AM2019-11-17T03:00:10+5:302019-11-17T03:00:17+5:30
मधुमेह रुग्णांसाठीही उपयुक्त भाजी; जंगलातून कंदमुळे आणून उभे केले पीक
- सुधीर लंके
अहमदनगर : कर्टुले ही जंगली वनस्पती आहे. तिची शेती केली जात नाही. मात्र, पारनेर तालुक्यात निघोज येथील शेतकºयाने जंगलातून कर्टुल्याचे कंद आणून एक एकर पीक उभे केले आहे. त्यांनी पिकविलेल्या कर्टुल्यांना मधुमेही रुग्णांकडून मोठी मागणी आहे. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. कारल्यासारखा तिचा वेल जातो. अॅपल बोराच्या आकाराची हिरवी फळे या वनस्पतीला येतात. ती काटेरी दिसतात. फळांमध्ये बियाही असतात. या फळांचा वास हा जंगली आहे. हे फळ उपयुक्त असले तरी त्याची शेती मात्र केली जात नाही. निघोज येथील राहुल अमृता रसाळ यांनी जंगलात जाऊन कुर्टुल्याचे कंद आणले. त्यापासून रोपे तयार केली.
चैत्र पालवीच्या काळात हवेत आर्द्रता वाढते. हवेतील आर्द्रता वाढली की या वनस्पतीचे वेल जातात व फळे येतात. आर्द्रता संपेल तसे उत्पन्न कमी होत जाते. एकदा वेल तयार झाला की तो सात वर्षे टिकतो.
कारल्याच्या शेतीप्रमाणे ही शेती करता येते. रसाळ यांनी पिकविलेल्या कर्टुल्यांना आत्तापर्यंत किलोमागे तीनशे रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. कर्टुल्यामध्ये नर व मादी असा फरक असतो. नर असलेल्या वेलाला फळे येत नाहीत. मात्र बागेत नर व मादी अशी दोन्ही रोपे लावावी लागतात. अशी रोपे मिळवून रसाळ यांनी ही शेती विकसित केली आहे.
रसाळांची शेती म्हणजे प्रयोगशाळा
राहुल रसाळ हे तरुण असून कृषी पदवीधर आहेत. पदवी घेतल्यानंतर ते पूर्णवेळ शेती करत आहेत. त्यांचे वडील अमृता रसाळ हेही शेतीत सतत प्रयोग करत आले आहेत. राहुल यांनी शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी स्वखर्चाने आठ देशांचा दौरा केला आहे. मशागतीसाठी ते स्वत: शेतात राबतात.
कर्टुल्याचे फळ हे मधुमेहावर उपयुक्त आहे, असे आपण वाचले होते. त्यामुळे या पिकाची शेती कशी करता येईल यावर अभ्यास केला. त्यातून एक एकर क्षेत्रात हे पीक घेतले आहे. - राहुल रसाळ, शेतकरी