रात्री आठनंतर जमावबंदी, रात्री नऊनंतर संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:02+5:302021-03-29T04:15:02+5:30
अहमदनगर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू केली, तेच आदेश नगर जिल्ह्यातही रविवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू ...
अहमदनगर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू केली, तेच आदेश नगर जिल्ह्यातही रविवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. एकत्र येण्यास रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंदी करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. उद्याने, बगिच्यामध्ये रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जाता येणार नाही. दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास आता दोनशेऐवजी पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी दुपारी याबाबत आदेश जारी केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. २८ मार्च ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत हे आदेश जारी राहणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनानेही स्थानिक आदेश देऊन नागरिकांच्या संचारावर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास प्रतिबंध व्हावा, म्हणून प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत. सर्व धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त ५० लोकांमध्येच लग्न समारंभ करता येणार आहेत. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे सक्तीचे राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालकांवर दंड करण्यात येईल. अंत्यसंस्कारप्रसंगी केवळ २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. शाळा-महाविद्यालये सुरूच राहणार असून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ८० टक्के व्यक्तींचा ७२ तासांत शोध घेण्याचा आदेश यंत्रणेला दिला आहे. याशिवाय सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास थेट कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
----------------
असे असतील निर्बंध
एकत्र येण्यास मनाई (जमावबंदी)- रात्री ८ ते सकाळी ७
फिरण्यावर बंदी (संचारबंदी)- रात्री ९ ते सकाळी ६
उद्याने, बगिच्यात जाण्यास बंदी- रात्री ८ ते सकाळी ७
सिनेमा, रेस्टारंट, हॉटेल, मॉल बंद राहतील- रात्री ८ ते सकाळी ७
दुकाने, मार्केट सुरू राहण्याची वेळ- सकाळी ८ ते सायंकाळी ७
--------------------
पाचशे- हजार रुपयांचा दंड
सध्या मास्क न वापरल्यास दोनशे रुपये दंड होता, तो आता पाचशे रुपये करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे आढळून आल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. जमावबंदीच्या काळात पाचपेक्षा जास्त एकत्र दिसल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. उद्यानातही दिलेल्या वेळेनंतर आढळून आल्यास एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे.
--------
रात्री आठपर्यंतच हॉटेल सुरू राहणार
जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टारंट, मॉल, सिनेमागृह रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद राहतील. मात्र, बंदच्या काळात हॉटेल, रेस्टारंट यांना घरपोच सेवा, पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापना, हॉटेल, रेस्टारंट १५ एप्रिलपर्यंत बंद करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड ठोठावण्यात येणार आहे.
----------------
होम क्वारंटाइनला परवानगी
डॉक्टरांच्या निगराणीखाली लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णाला घरामध्येच विलगीकरणात राहता येईल. संबंधित रुग्णाने नियमांचे पालन केले नाही तर संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच जबाबदार धरण्यात येईल. विलगीकरणाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाईल. होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णाच्या दरवाजावर व रुग्णाच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-----------
कोरोना छायाचित्र