सायकलवरून संसदेत जाणारे उत्तमचंद बोगावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 12:10 PM2019-08-16T12:10:43+5:302019-08-16T12:11:13+5:30
गुळगुळीत कागदावर छापलेले त्यांचे कार्यअहवाल उपलब्ध नाहीत. त्यांचं नाव कोरलेल्या कोनशिला, कोणत्या इमारतीवर आहेत की नाही, माहीत नाही! एवढं नक्की की, जनतेनं आपल्याला कशासाठी निवडून पाठविलं आहे, याची पुरेपूर जाणीव नगरचे पहिले खासदार उत्तमचंद ऊर्फ भाऊसाहेब बोगावत यांना होती.
अहमदनगर : लोकसभेची पहिली निवडणूक. तेव्हाच्या नगर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. पूर्ण निवडणुकीचा त्याचा खर्च होता फक्त १३ हजार रुपये!
`आपण ह्यइन्कम टॅक्स` भरतो. मग स्वातंत्र्यसैनिकांसाठी असलेली पेन्शन आपण कशाला घ्यायची? नकोच ती. कुणा गरजूच्या उपयोगी येतील ते पैसे. पंडितजी पंतप्रधान आहेत मान्य. पण तेही आपल्यासारखे माणूसच आहेत. त्यांच्याशी बोलायला काय घाबरायचं?
- वरच्या तिन्ही गोष्टी एकाच माणसाशी संबंधित आहेत. उत्तमचंद रामचंद बोगावत! फार फार वर्षांपूर्वी आचार्य आनंदऋषी महाराज यांचे सहाध्यायी, शाळासोबती. पहिल्या लोकसभेत नगर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले यू. आर. बोगावत, म्हणजेच घरच्यांचे, सर्वसामान्यांचे भाऊसाहेब. वकील, स्वातंत्र्यसैनिक, सत्याग्रही, नगरचे नगराध्यक्ष आणि पहिले खासदार. नगरमधील खिस्त गल्लीतील एक छोटा रस्ता त्यांच्या नावाने आहे. तसा फलक आहे, एवढंच. आयुष्यभर समाजहिताचं काम केलेल्या या नेत्याची बाकी परिस्थिती `नाही चिरा, नाही पणती` अशीच आहे. नगरकर ज्याचं पाणी पितात, ते मुळा धरण व्हावं म्हणून भाऊसाहेब आग्रही होते. त्यासाठी तेव्हाचे दिग्गज नेते मोरारजीभाई देसाई यांच्याशी टक्कर द्यायला ते घाबरले नाहीत.
मिरी (ता. पाथर्डी) येथे राहणाऱ्या भाऊसाहेबांचा जन्म २८ आॅगस्ट १९०० रोजीचा आणि १२ सप्टेंबर १९८३ रोजी त्यांनी कृतार्थपणे जगाचा निरोप घेतला. या उण्यापु-या ८३ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी बरंच काही केलं - माणसांसाठी, वंचितांसाठी, शहरासाठी, मतदारसंघासाठी. आचार्य आनंदऋषी यांचं बालपणीचं नाव `गोटीराम`. उत्तमचंद आणि गोटीराम, दोघेही एकाच गुरूचे शिष्य. मिरीतल्या शाळेत सातवीपर्यंत एकत्र शिकले. पुढे काय, असा प्रश्न सातवीनंतर पुढे आला. गुरुजींनी उत्तमचंद यांना सांगितलं, `तू नगरला जा आणि पुढे शिक. भाऊसाहेब फिरोदियांना मी चिठ्ठी देतो. ते तुझी सोय लावतील.`
आपल्या मित्राचं काय, असा प्रश्न भाऊसाहेबांना पडला. गुरुजींकडं उत्तर होतं - तो धार्मिक शिक्षण घेईल. अध्यात्माचा व्यासंग केलेला हा विद्यार्थीच पुढे सर्वसामान्य भक्तांसाठी `आचार्यसम्राट आनंदऋषी` म्हणून प्रसिद्ध झाला. अध्यात्मिक क्षेत्रात एवढी उंची गाठूनही आनंदऋषींना बालमित्राचा कधी विसर पडला नाही. प्रत्येक प्रवचनाच्या सुरुवातीला ते भाऊसाहेबांचं आवर्जून नाव घेत. त्यांच्या पुढाकाराने पाथर्डीत विविध धार्मिक, शैक्षणिक उपक्रम सुरू झाले. त्याची जबाबदारी भाऊसाहेबांवर होती. आचार्यसम्राट त्यांना म्हणत -`शक्य आहे तोवर तूच हे काम बघ. माझा तुझ्यावर फार विश्वास आहे रे.` या विश्वासाला भाऊसाहेबांनी तडा जाऊ दिला नाही.
गुरुजींची चिठ्ठी घेऊन उत्तमचंद बोगावत नगरला दाखल झाले. भाऊसाहेब फिरोदिया यांच्या घरी राहून, तिथे पडतील ती कामं करून त्यांनी इंग्रजी मॅट्रिक पूर्ण केले. मग वकील व्हायचं म्हणून मुंबईला गेले. तिथं पाच वर्षं राहून `हायकोर्ट प्लीडर` अभ्यासक्रम पूर्ण केला. वकिलीची सनद मिळवून नगरला परतले. भाऊसाहेब फिरोदिया यांचा प्रभाव होताच. त्यांचेच सहायक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केले. यू. आर. बोगावत आता `भाऊसाहेब` म्हणून ओळखले जाऊ लागले.
भाऊसाहेब फिरोदिया यांच्यामुळेच बोगावत राजकारणात उतरले. तो काळ स्वातंत्र्य मिळविण्याच्या ईष्येर्ने झपाटलेल्या माणसांचा होता. महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे भाऊसाहेब स्वाभाविकपणे चळवळीत ओढले गेले. मिठाच्या सत्याग्रहात ते सहभागी झाले. त्या वेळी त्यांना महात्माजींना जवळून अनुभवता आलं. मग बुलेटिन छापणं व वाटणं, गुप्त बैठका घेणं, भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांना आश्रय देणं... अशी वेगवेगळी जबाबदारी ते घेऊ लागले. सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना साडेचार वर्षांची शिक्षाही झाली. ती त्यांनी येरवडा व नाशिक येथील कारागृहांमध्ये भोगली. त्यांची मोटारगाडीही ब्रिटिशांनी जप्त केली. त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागून त्यांनी ती परत मिळविली.
वकिलीबरोबर राजकारण आणि समाजकारणही भाऊसाहेबांचं कार्यक्षेत्र झालं. लोकल बोर्डात आणि नंतर नगरच्या नगरपालिकेत ते निवडून गेले. २५ फेब्रुवारी १९४६ ते २२ डिसेंबर १९४७ या काळात ते नगराध्यक्ष होते. त्यांच्याच कारकिर्दीत पिंपळगाव माळवी तलावाचं काम मार्गी लागलं. त्यासाठी ते रोज सायकलवरून तिथे जात. पालिकेकडून मिळणारे वेतन आणि भत्ते घेण्याचा प्रश्नच नव्हता. आपण लोकसेवक आहोत, याची जाण असण्याचा तो काळ होता.
राजकारणाचं अधिक मोठं अवकाश भाऊसाहेबांना खुणावत होतं. तशी संधी चालून आली लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत. नगर दक्षिणमधून त्यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली. पक्षात तेव्हाही आतासारखी उद्योगी बाळं असावीत. कोणीतरी काही तरी चुकीची माहिती दिली आणि भाऊसाहेबांच्या नावावर काट मारली गेली. हे कळल्यावर भाऊसाहेब थेट लालबहादूर शास्त्री यांना भेटले. शास्त्रीजींनी शिष्टाई केली आणि काँग्रेसचे भाऊसाहेब व कामगार किसान पक्षाचे भाई न. न.सथ्था यांच्यात लढत झाली. भाऊसाहेब २१ हजार ६०० मतांनी निवडून आले. घरची भाजी-भाकरी बांधून घेऊन पक्षाचा प्रचार करणारे कार्यकर्ते तेव्हा होते. भाड्याने सायकली घेऊन ते फिरत. `महात्मा गांधी की जय`, `पंडित नेहरू की जय` अशा घोषणांचा गजर करूनच रोजच्या प्रचाराला सुरुवात होई, अशी आठवण भाऊसाहेबांचे चिरंजीव अशोककुमार बोगावत सांगतात. त्याच निवडणुकीत नगर उत्तर मतदारसंघातून (नंतर कोपरगाव व आताचा शिर्डी) काँग्रेसकडून पंढरीनाथ कानवडे निवडून आले. भाऊसाहेब व कानवडे दोघांचीही मैत्री पहिल्या लोकसभेतील सहवासाने अधिक घट्ट झाली.
खासदार म्हणून भाऊसाहेबांनी काय केलं? गुळगुळीत कागदावर छापलेले त्यांचे कार्यअहवाल उपलब्ध नाहीत. त्यांचं नाव कोरलेल्या कोनशिला कोणत्या इमारतीवर आहेत की नाही, कुणास ठाऊक! पण एवढं नक्की की, जनतेनं आपल्याला कशासाठी निवडून पाठविलं आहे, याची पुरेपूर जाणीव त्यांना होती. त्या काळी गावोगावी टपाल कार्यालयं नव्हती. दहा-वीस गावांना मिळून एखादं कार्यालय असे. संपर्कासाठी टपाल कार्यालय महत्त्वाचं माध्यम आहे, हे ओळखून गावोगावी शाखा टपाल कार्यालयं सुरू करण्याचा ठराव त्यांनी लोकसभेत मांडला. तो मंजूरही झाला. संसद सदस्यांच्या निवृत्तीवेतनाचा मुद्दाही भाऊसाहेबांनीच धसास लावला.
नगर जिल्ह्यात १९५२-५३ या वर्षात मोठा दुष्काळ पडला. `दुर्गादेवीचा दुष्काळ` म्हणून तो ओळखला जातो. कर्जत-जामखेड तालुके दुष्काळानं अक्षरश: गांजले होते. धान्यच नव्हतं म्हणून लोक बरबड्याची भाकरी खात. ही सारी विदारक परिस्थिती भाऊसाहेबांनी लोकसभेत मांडली. ते ऐकताना न रहावून पंडित नेहरू म्हणाले, `क्या झूठ बात करते हो। झूठ मत बोलो...` त्यावर भाऊसाहेबांनी `आप मेरे साथ चलो।` असं नेहरूंना आवाहन केलं. त्यानुसार पंतप्रधानांनी दौरा केला़ सारी परिस्थिती डोळ्यांनी पाहिली आणि पुरेसं धान्य व कडबा पाठविण्याचा आदेश तिथूनच बिनतारी संदेश यंत्रणेवरून दिला! त्याच दुष्काळात रेल्वे पुलाजवळचं सरकारी गोदाम फोडून भाऊसाहेबांनी लोकांना धान्याचं वाटप केलं. त्याबद्दल त्यांना अटकही झाली.
मुळा धरण आणि कुकडी हे नगर जिल्ह्याचे जिव्हाळ्याचे विषय. ते भाऊसाहेबांनी लोकसभेत लावून धरले. मुळा धरण जवळपास मंजूर झालं होतं. त्याच वेळी मोरारजीभाई देसाई गुजरातेतील उकाई धरणासाठी आग्रही होते. ते ज्येष्ठ नेते. त्यांच्या शब्दाला अधिक वजन. `तुमच्याकडे नद्या आहेत. आम्ही कोरडवाहू. मुळा धरण आधी होऊ द्या,` असं भाऊसाहेब सांगत. काय झालं कुणास ठाऊक; पण मुळा धरणाचे नकाशे व कागदपत्रं गायब झाली. भाऊसाहेबांनी चिकाटीनं ती सारी पुन्हा जमवून सादर केली. प्रयत्नांना फळ आलं - मुळा आधी व उकाई नंतर झालं.
लोकसभेच्या या कारकिर्दीत भाऊसाहेबांचा अनेकांशी स्नेह जडला. त्यापैकीच एक दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. सायकलवरून सभागृहात जाणारे एकमेव सदस्य म्हणजे भाऊसाहेब. ते पाहून शास्त्रीजी अधूनमधून त्यांना आपल्या जीपमधून नेत. नित्यनियमाने योगासने करणा-या भाऊसाहेबांकडे शास्त्रीजींनी `मला तुमच्यासारखं शीर्षासन करायला शिकवा`, असा आग्रह धरला होता. गणपतराव तपासे, भाऊसाहेब हिरे, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, तुळशीदास जाधव, पुणतांब्याचे आमदार जगन्नाथ पाटील बारहाते हे सारेच भाऊसाहेबांसाठी मैत्र जिवाचे या प्रकारात मोडणारे होते. लोकसभेचे अध्यक्ष अनंतशयनम् अय्यंगार यांच्याशीही त्यांचा चांगला स्नेह होता. अय्यंगार नगरच्या दौ-यावर आले तेव्हा, भाऊसाहेबांच्या घरी मुद्दाम गेले.
तो काळ पंडित नेहरूंचा होता. जेवढं आकर्षण, तेवढीच त्यांच्याबद्दल भीतीही. महावीर त्यागी व भाऊसाहेब पंडितजींशी मोकळेपणाने संवाद साधत. त्यांना प्रश्न विचारत. कानवडे यांना मात्र हे नको ते साहस वाटे़ भाऊसाहेबांनी गप्प राहावं, म्हणून ते त्यांची शेरवानी ओढत. त्यांना भाऊसाहेब म्हणत, `अहो, पंडितजी असले म्हणून काय? तेही आपल्यासारखेच माणूस आहेत.` संसदेच्या सदस्यांच्या घरामध्ये केलेल्या फर्निचरचा खर्च अव्वाच्या सव्वा होता. भाऊसाहेबांनी थेट पंतप्रधानांशी बोलून `त्यात नक्कीच काही तरी गडबड आहे,` हे दाखवून दिलं. संसदेच्या सदस्याचं पहिलं शिष्टमंडळ चीनला गेलं, त्यात भाऊसाहेबांचा समावेश होता. महाराष्ट्रातील ते एकमेव सदस्य.
गांधीवादी म्हणवून घेणा-या भाऊसाहेबांनी आयुष्यभर गांधी-विचारांवर निष्ठा ठेवली. काँग्रेसच्या विचाराशी असलेली बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत पाळली. आयुष्यभर त्यांनी खादीशिवाय दुसरा कपडा वापरला नाही. त्यासाठी घरच्या चरख्यावर ते सूत कातत. राजकारणाबरोबरच विविध धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. वर्धमान स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाचे ते २२ वर्षे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी कोणताही भत्ता घेतला नाही. स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र व राज्य सरकारांकडून मिळणारं मानधन घेण्याचंही त्यांच्या कधी मनात आलं नाही.
गरिबीशी झगडून भाऊसाहेब शिकले व आयुष्यात स्थिरावले. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते खेडोपाडी जाऊन कापूस गोळा करीत व तो घोेड्यावरुन नगर येथे आणून विकत. कुस्तीच्या छंदाचाही त्यांनी असाच उपयोग केला. कुस्त्यांची मैदानं मारून ते फेटे जिंकत. ते फेटे विकून आलेले पैसे शिक्षणासाठी खर्च होत. त्यामुळेच गरिबांविषयी त्यांच्या मनात सदैव आस्था होती. शक्य होईल तेव्हा त्यांनी मदत केली. अनेकांना नोकरी मिळवून दिली. भूदान यात्रेच्या वेळी आचार्य विनोबा भावे नगरला आले, तेव्हा भाऊसाहेबांनी आपली बुरुडगावची २१ एकर जमीन त्यांना दिली. दुर्दैवाने त्या जमिनीचे पुढे काहीच झाले नाही. स्वभावानं तापट असलेल्या भाऊसाहेबांना खोटं बोललेलं आवडत नसे. कष्टाला व प्रामाणिकपणाला पर्याय नाही, हेच त्यांच्या आयुष्याचं ब्रीद होतं.
भाऊसाहेब असा जगाचा संसार करीत असताना, त्यांचा संसार संभाळला पत्नी गीताबाई यांनी. मुले-मुली, पुतणे यांचं सारं काही सुरळीत होईल, याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं.
मोतीलाल फिरोदियांसाठी सोडली उमेदवारी
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ऐन भरात असताना दुस-या लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अपक्ष र. के. खाडीलकर यांनी भाऊसाहेबांचा २४ हजार मतांनी पराभव केला. त्याच्या पुढच्या, म्हणजे १९६२ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळाली होती. पण भाऊसाहेब फिरोदिया यांचे ऋण मान्य करीत त्यांनी मोतीलाल फिरोदिया यांच्यासाठी उमेदवारी नाकारली. मनापासून काम करीत त्यांना निवडून आणलं. त्यानंतर भाऊसाहेब हळूहळू सक्रिय राजकारणापासून लांब होत गेले. सामाजिक कामापासून मात्र ते कधीच दूर गेले नाहीत.
‘देशभक्त’ उपाधी
वडील कर्मठ आणि भाऊसाहेबांचं त्यांच्या अगदी उलट. जन्माधारित जातिभेद त्यांनी कधीच पाळला नाही. सर्व नेत्या-कार्यकर्त्यांसाठी त्यांचं घर, त्यांची बैठक नेहमीच खुली होती. हुंड्याच्या प्रथेबद्दल त्यांना मनापासून घृणा वाटत असे. म्हणूनच त्यांनी आपल्या चार व भावाच्या सहा, अशा दहा मुलींचे विवाह त्यांना हुंडा न देताच लावून दिले. त्यांच्या आठवणी सांगताना सूनबाई आभा यांचे डोळेही आजही भरून येतात. ‘मी अगदी गरीब घरातून आलेली. जेमतेम चौथी पास. आमच्याकडून काही न घेता भाऊसाहेबांनी मला सून म्हणून घरी आणलं. नंतरच्या काळात मला असं काही घडवलं की, शिक्षणाची उणीव आजही भासत नाही,’ असं त्या अभिमानाने सांगतात.
आपल्या खासदारकीचे काही लाभ आपल्या वारसांना मिळावेत, असं भाऊसाहेबांना कधीच वाटलं नाही. त्यांचे चिरंजीव अशोककुमार व सूनबाई आभा यांनाही त्याची खंत नाही. भाऊसाहेबांच्या नावाआधी वापरली जाणारी ‘देशभक्त’ उपाधी त्यांना सुखावणारी वाटते.
हे सारं ऐकल्या-वाचल्यावर मनात येतं-
असेही आपले खासदार होते?
असेही आपले खासदार होते!
परिचय
जन्म : २८ आॅगस्ट १९००
गाव : मिरी, ता. पाथर्डी
शिक्षण : हायकोर्ट प्लीडर (एल.एल.बी.)
भूषविलेली पदे
- १९४६ : नगर पालिकेचे नगराध्यक्ष.
- १९५२ : नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार.
- वर्धमान स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाचे २२ वर्षे अध्यक्ष.
लेखक - सतीश स. कुलकर्णी ( मुक्त पत्रकार व ब्लॉगर )