दहिगावने ते शेवगाव बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:45+5:302021-02-09T04:22:45+5:30
दहिगावने : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला. त्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांची रेलचेल ...
दहिगावने : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला. त्यामुळे जनजीवन सुरळीत होत आहे. लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांची रेलचेल वाढली. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी पासेसची संख्याही वाढली. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव या भागात बसेसच्या दिवसाला दोन फेऱ्या सुरू केल्या असल्याची माहिती शेवगावचे आगारप्रमुख वासुदेव देवराज यांनी दिली.
ही बससेवा सुरू व्हावी, याबाबत ‘लोकमत’नेही वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते.
संचारबंदीचे नियम शिथिल होऊन गावागावांत भरणारे आठवडे बाजार गर्दीने फुलले आहेत. छोटे-मोठे व्यापारी व जनतेची उलाढाल वाढल्याने दळणवळणात वाढ झाली आहे. मात्र, मागील दहा महिन्यांपासून ग्रामीण भागात बससेवा बंद होती. याचा दळणवळणाची सुविधा नसलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. त्यामुळे दहिगावने ते शेवगाव बससेवा सुरू करावी, अशी मागणी जनतेकडून वारंवार होत होती. मात्र, आर्थिक गणित जुळत नसल्याने बसच्या फेऱ्या सुरू करणे शक्य होत नव्हते. आता शाळा सुरू होऊन विद्यार्थी पासेसची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
----
ग्रामीण भागात बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संख्या व आर्थिक गणित जुळणे गरजेचे होते. त्यात शाळा सुरू झाल्याने तालुक्यातील १ हजार ५२६ विद्यार्थ्यांना आजपर्यंत पासेस दिले आहेत. त्यामुळे राणेगाव, कांबी, दहिगावने, धनगरवाडी, नागलवाडी, वाघोली आदी भागांतील बसेसच्या काही फेऱ्या सुरू केल्या आहेत. गरजेनुसार यात वाढ केली जाईल.
- वासुदेव देवराज,
आगार व्यवस्थापक, शेवगाव