सुपा बाजारताळावर दररोज कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:10+5:302021-07-07T04:26:10+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे बाजारतळ चौकात दररोज कोरोना शिबिरांद्वारे कोरोना संशयित रुग्णांची होणारी नियमित तपासणी, ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे बाजारतळ चौकात दररोज कोरोना शिबिरांद्वारे कोरोना संशयित रुग्णांची होणारी नियमित तपासणी, बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी लॉकडाऊनचा निर्णय, तर शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू, मास्क लावण्याबाबत ग्रामस्थांमध्ये झालेली जागृती, त्याचबरोबर दररोज चारनंतर व्यावसायिकांकडून होणारी दुकाने बंद, त्यानंतर कमी होणारी गर्दी आदींमुळे येथील कोरोना चेन ब्रेक करण्यात यश आले आहे.
येथे गेल्या आठ-दहा दिवसांत सुप्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. सुपा येथे परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिकांचा जवळपास दररोज या ना त्या कारणाने संपर्क येतो. त्यामुळे येथे कोरोना चेन ब्रेक करण्याचे मोठे आव्हान होते. ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत, ग्रामसुरक्षा समिती यांच्या सतर्कतेने, नियमित लक्ष घातल्याने येथे कोरोना चेन तोडण्यात यश मिळाले, असे सरपंच मनीषा रोकडे व उपसरपंच सागर मैड यांनी सांगितले. कोरोना आटोक्यात आल्याने शाळकरी मुलांना आता शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
कोरोना
आटोक्यात आणणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डॉक्टर्स डे निमित्त ग्रामस्थांनी सन्मान केला. यावेळी माजी सभापती दीपक पवार, उद्योजक योगेश रोकडे, उपसरपंच सागर मैड, प्रताप शिंदे, तलाठी बाळासाहेब कुसमुडे, अरुण ठोकळ आदींच्या उपस्थितीत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर, आरोग्य सेविका अंजली वरपे, विजय भोईर, आरोग्य पर्यवेक्षक प्रवीण शिंदे, महेंद्र मोटे यांचा सन्मान करण्यात आला.
----
०५ सुपा कोरोना
सुपा येथे बाजारतळ चौकात डॉक्टर डे निमित्त आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.