दररोज होणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:16+5:302021-07-17T04:17:16+5:30
शेवगाव : गत दहा-बारा दिवसांपासून तालुक्यातील आखेगाव परिसरात दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिके धोक्यात ...
शेवगाव : गत दहा-बारा दिवसांपासून तालुक्यातील आखेगाव परिसरात दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पाणी साचून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही परिसरात पाऊस होत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र अति पावसाने हातचे पीक वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. आखेगाव परिसरात दहा ते बारा दिवसांपासून रोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात अति पावसाने शेतांमध्ये पाणी उफाळून आल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणी साचून चिखल व पाण्यामुळे बहरलेल्या पिकांची मुळे सडून पिके वाया गेली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, बाजरी, तूर, मूग, भुईमूग आदी पिकांची पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. जूनच्या सुरुवातीला व त्यानंतर झालेल्या पावसाने पिके बहारदार उगवून आली होती. मात्र दररोज होणाऱ्या पावसाने पीक वाया जाऊन मशागत, बी-बियाणांसाठी केलेली मेहनत व खर्च वाया गेला आहे.
परिसरात रोज होणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे आखेगावचे शेतकरी दादासाहेब डोंगरे यांनी सांगितले.
-----
खर्चाची जुळवाजुळव करताना अडचणी...
मशागत व झालेला खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन वापसा मिळाल्यानंतरच रब्बी हंगामाची तयारी परिसरातील शेतकऱ्यांना करता येणार आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करताना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचे उपसरपंच वृंदावनी डोंगरे यांनी सांगितले.
-----
१६ आखेगाव
आखेगाव येथे सततच्या पावसाने शेतात साचलेले पाणी.