दुग्ध उत्पादक आर्थिकदृष्ट्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:49+5:302021-05-25T04:23:49+5:30

राहुरी : शेतकऱ्यांकडे जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत दुधाचे भाव ...

Dairy producers in financial crisis | दुग्ध उत्पादक आर्थिकदृष्ट्या संकटात

दुग्ध उत्पादक आर्थिकदृष्ट्या संकटात

राहुरी : शेतकऱ्यांकडे जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत दुधाचे भाव तब्बल दहा ते अकरा रुपये लिटरप्रमाणे कोसळले आहेत. दुसऱ्या बाजूला पशुखाद्याच्या किमती वाढल्या असून, जनावरांचे भावदेखील कोसळले आहेत.

शेतीबरोबरच दूध व्यवसायावर शेतकरी तग धरून होते. मात्र, दुधाचे भाव कोसळल्याने दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे खाद्याचे भाव ३०० रुपयांनी वाढले असताना दुसऱ्या बाजूला प्रतिलिटर दहा ते ११ रुपयांनी दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात आला आहे. एक लिटर दूध निर्मितीसाठी २५ ते २७ रुपये खर्च येत आहे. याउलट उत्पादन केलेले दूध २१ रुपये प्रमाणे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुग्धजन्य पदार्थ पेढे, लस्सी, ताक, आइस्क्रीम, श्रीखंड यांची दुकाने बंद असल्यामुळे दुधाला मागणी घटली आहे. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाच्या पावडरचा साठा तयार आहे. त्यामुळे दुधाला पर्याय दूध पावडर आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर दुधाची पावडर बाजारपेठेत उपलब्ध आहे.

त्याचा परिणामही दूध मागणी घटण्यावर झाला आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे चारादेखील महागला आहे. घास, ऊस, मका व अन्य खाद्यपदार्थाचे भाव वाढले आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. जनावरांचे बाजारदेखील बंद असल्यामुळे जनावरे कोणी विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाही. जनावरांच्या किमतीदेखील ३० ते ४० टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत. अशा मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे.

-------

बाजारपेठेत दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थाची मागणी घटली आहे. दुसरीकडे दूध पावडरीचा स्टॉक शिल्लक आहे. त्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. दुधाची मागणी घटल्यामुळे दुधाला ३२ रुपये प्रति लिटरवरून २१ ते २२ रुपये प्रति लिटर इतका भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात आहे.

- गणेश भांड, चैतन्य मिल्क संचालक, देवळाली प्रवरा

---------

आज मिळत असलेल्या दूध दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दूध दरप्रश्नी लक्ष देत किमान शेतकऱ्यांना दूध व्यवसायात आर्थिक नुकसान होणार नाही याचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती भूमिका घेतली पाहिजे.

- मधुकर म्हसे,

शेतकरी, कोंढवड, राहुरी

------

सध्याचे पशु खाद्य भाव (कंसात आधीचे)

पेंड १६५० (१४००)

वालिस १०५० (९५०)

कांडी १३०० (१२००)

मका पीठ १०५०(८५०)

Web Title: Dairy producers in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.