दत्त जयंतीनिमित्त देवगडला भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:28 PM2018-12-22T13:28:43+5:302018-12-22T13:29:05+5:30
मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आज पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली.
नेवासा : मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आज पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली.
गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे साडेतीन वाजता भगवान श्री गुरू दत्तात्रयांच्या मूतीर्चे पूजन करून अभिषेक घातला. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी महाआरती बरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. नगर जिल्ह्यासह मराठवाडा व राज्यातील भाविक सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी करत असून दुपारी तीन वाजेनंतर श्री दत्तजन्म सोहळ्यास सुरवात होऊन सायंकाळी ६ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार असून यावेळी धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक ही संस्थानच्या वतीने तैनात करण्यात आले आहे. नेवासा, नगर, श्रीरामपूर, गंगापूर, शेवगाव या आगरातून भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण देशासह आज श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जन्म सोहळा पार पडत आहे. दिवसभरात सहा ते सात लाखांपर्यंत भक्त गण भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होतील. सायंकाळी सहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात दत्त नामाच्या जयघोषयात दत्तजन्म सोहळा संपन्न होणार आहे. - गुरुवर्य भास्करगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड संस्थान