बंधारा फुटला, पाझर तलाव खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 01:36 PM2020-10-18T13:36:02+5:302020-10-18T13:36:53+5:30
शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील सिमेंटचा बंधारा फुटला आहे. तर चेडे चांदगाव शिवारातील पाझर तलावाची भिंत मधोमध खचली आहे.
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील सिमेंटचा बंधारा फुटला आहे. तर चेडे चांदगाव शिवारातील पाझर तलावाची भिंत मधोमध खचली आहे. सध्याच्या पाण्याच्या प्रवाहाने आजुबाजूच्या शेतीला तसेच लोकवस्त्यांना धोका संभवू शकतो. यामुळे येथील माजी उपसरपंच अर्चना किशोर दहिफळे यांनी शुक्रवारी (दि.१६) जलसंधारणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत दुरूस्तीची मागणी केली आहे. ठाकूर पिंपळगाव येथे शेवगाव-गेवराई महामार्गालगत गोयकर वस्तीनजीक खटकळ नदीवर २०१६-१७ मध्ये एक सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमूळे या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. या बंधाऱ्याच्या सिमेंट भिंतीलगतचा पश्चिमेकडील काठ फोडून पाणी बाहेर ओसंडून वाहत आहे. पाण्याच्या जोर जास्त असल्याने बंधारा अक्षरशः उधडला आहे. चेडेचांदगाव शिवारात १९७२ च्या आसपास निर्मिती असलेल्या पाझर तलावाची मातीची भिंत मधोमध दबली गेलेली आहे. या पाझर तलावात सध्या ८० टक्के पाणी आहे. परंतु, जर तलाव काठोकाठ भरला तर सांडव्याऐवजी पाणी मधूनच बाहेर पडू शकते. याचा आजुबाजूच्या शेतीला तसेच लोकवस्तीला फटका बसू शकतो. या भीतीने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. मला जामखेड येथे थोडे काम आहे. सदरील भाग माझ्याकडेच आहे. त्याबाबत उद्या किंवा परवा पाहू, असे जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता यू.डी.कुमकर यांनी सांगितले.
|