धरणे भरली! शेतकऱ्यांना आता बंधारे भरण्याची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:26 AM2021-09-16T04:26:59+5:302021-09-16T04:26:59+5:30

पाचेगाव : जिल्ह्याच्या उत्तरेत पाणलोट क्षेत्रामध्ये ऑगस्टपर्यंत पावसाचे पर्जन्यमान कमी राहिल्याने येणारा काळ पाण्यासाठी गाजणार अशीच चिन्हे सर्वत्र दिसत ...

The dam is full! Farmers now hope to fill the dams | धरणे भरली! शेतकऱ्यांना आता बंधारे भरण्याची आस

धरणे भरली! शेतकऱ्यांना आता बंधारे भरण्याची आस

पाचेगाव : जिल्ह्याच्या उत्तरेत पाणलोट क्षेत्रामध्ये ऑगस्टपर्यंत पावसाचे पर्जन्यमान कमी राहिल्याने येणारा काळ पाण्यासाठी गाजणार अशीच चिन्हे सर्वत्र दिसत होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाणलोटसह लाभक्षेत्रात दमदार हजेरी लावल्याने भंडारदरा, निळवंडे, मुळा ही धरणे ओसंडून वाहू लागली. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आता नदीपात्रातील बंधारे भरण्याची शेतकऱ्यांना आस आहे.

बुधवारी सकाळी भंडारदरा धरणात ११ हजार ०३९ दलघफू (१०० टक्के), निळवंडे धरणात ७ हजार ८९० दलघफू(९४.८३ टक्के), तर मुळा धरणात २४ हजार ७३१ दलघफू (९५.११ टक्के) इतका पाणीसाठा होता. सध्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बुधवारी मुळा आणि निळवंडे धरणातून नदीपात्रात सोडला जात असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे.

प्रवरा आणि मुळा नदी वाहती झाल्याने प्रवरेवरील आश्वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, गळनिंब, मांडवे, केसापूर, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर, तर मुळेवरील डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजूळपोही अशी १९ बंधारे भरण्याची आस लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे.

प्रवरेवरील सर्व बंधारे भरण्यासाठी साधारण एक टीएमसी, तर मुळा नदीवरील बंधारे भरण्यासाठी अर्धा टीएमसीपेक्षा कमी पाणी लागते. प्रवरा आणि मुळा नदीवरील सर्व छोटी मोठी धरणे भरल्याने दोन्ही नद्यांवरील बंधारे वेळेत भरली जावीत, अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा ६५ टक्क्यांच्या पुढे जाईल. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे संकट यंदा तूर्तास टळणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये असलेले चिंतेचे ढग कमी झाले आहे.

खरीप अंतिम टप्प्यात असून, पिकाच्या सोंगण्याही सुरू आहेत. शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन सुरू आहे. मुळा, भंडारदराची आवर्तने वेळेत मिळाल्यास, तसेच नदीपात्रातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यास लाभक्षेत्रातील रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या पिकांच्या पाण्याची चिंताही मिटेल.

--------

बंधारे भरण्याचे अजून कुठलेही नियोजन नाही. पावसाचा अंदाज घेऊन आणि बंधाऱ्यांना कुठलाही धोका पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेऊनच बंधारे भरण्याची परवानगी दिली जाणार आहे.

-महेश शेळके,

सिंचन शाखाधिकारी, बेलपिंपळगाव

-----

१५ पाचेगाव

पाचेगाव येथील प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून वाहत असलेले पाणी. (छायाचित्र : रमेश शिंदे)

Web Title: The dam is full! Farmers now hope to fill the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.