मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 06:53 PM2019-07-26T18:53:46+5:302019-07-26T18:55:28+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात.

Dam is half as much as last year | मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

मागील वर्षीच्या तुलनेत धरणसाठे निम्म्यावर

अहमदनगर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने धरणसाठे निम्म्यावर आले आहेत. भंडारदरा, मुळा, निळवंडे ही मोठी धरणे १५ आॅगस्टच्या आसपास भरण्याच्या उंबरठ्यावर असतात, मात्र
सध्या या धरणांत ४० टक्केही पाणीसाठा नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्वच स्थिती चिंताजनक बनली आहे.
मागील वर्षी जुलैअखेर सरासरी ४३ टक्के पाऊस झाला होता. यातही पाणलोटात चांगला पाऊस असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांत झपाट्याने पाण्याची आवक झाली. मागील वर्षी २५ जुलैला भंडारदऱ्यात ८४ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो केवळ ४५ टक्के आहे. तसेच मुळा धरणात मागील वर्षी ५६ टक्के व निळवंडेत ६५ टक्के असलेला साठा यंदा अनुक्रमे ३२ व २० टक्क््यांवर खाली घसरला आहे.
भंडारदरा धरण दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत भरते. मागील वर्षीही ते भरले होते. परंतु यंदा मात्र ते १५ आॅगस्टपर्यंत भरेल अशी स्थिती नाही. अकोले तालुक्यात पुढील २० दिवस सलग पाऊस झाला तर धरण भरण्याच्या आशा आहेत. अन्यथा १५ आॅगस्टची ही परंपरा मोडण्याची शक्यता आहे. मुळा धरणात मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत मुबलक पाणीसाठा झाला होता. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. धरणांतील पाण्यानेच संपूर्ण जिल्ह्याची तहान भागवली.
अजूनही मागील वर्षीच्या पाण्यावरच सातशेहून अधिक टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.
मात्र यंदा धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नाही. सध्या तो सुरू असला तरी त्याला अपेक्षित वेग नाही. त्यामुळे पाण्याची आवक मंद गतीने होत आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी धरणसाठे निम्म्यापेक्षा खाली असल्याने चिंतेचे ढग पसरले आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यात सुमारे २ लाख हेक्टर (५० टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसाने या पिकांना सध्या तरी संजीवनी मिळाली आहे. परंतु जमिनीतील पाणीपातळी वाढेल असा सलग पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे.

मागील वर्षी २५ जुलैपर्यंत सरासरी २१३ मिमी (४३ टक्के) पाऊस झाला होता. यंदाही तो ४३ टक्के आहे. मात्र पाणलोटात कमी आहे. यंदा श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या सहा तालुक्यांत ३० टक्क्यापेक्षा कमी पाऊस आहे.

Web Title: Dam is half as much as last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.