धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो ; ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:37 PM2017-10-11T17:37:40+5:302017-10-11T17:37:46+5:30
धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.
राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्हयाची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडून बुधवारी सकाळी ४ हजार क्युसेक्सने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले.
धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. ११ दरवाजे प्रत्येकी चार इंच उंच करून पाण्याला वाट करून देण्यात आली.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरले़ कोतूळ येथे १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ नदी पात्रात पाणी सोडण्यापूर्वी मुळा नदी काठी असलेल्या ग्रामपंचयाती,राहुरी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय यांना पाटबंधारे खात्याने कळविले. मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. यावेळी धरण शाखा अभियंता शामराव बुधवंत, सतीश जाधव,संदीप शिंगाडे, गुलाब शेख, दिलीप कुलकर्णी, दत्तू पवार, बबन शिंदे, सलीम शेख आदी उपस्थित होते.
बुधवारी दिवसभर लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर पावसाची रिमझिम सुरू होती़ परतीचा पाऊस असल्याने शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही़ मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
या पावसाळ्यात मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर २१ सप्टेंबरला मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. गेल्या आठवड्यात आवक घटल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता़ बुधवार ११ आॅक्टोबरला धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी सोडण्यात आले. १९७१ पासून मुळा धरण २७ वेळा पूर्ण क्षमतेने भरले.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़ पाण्याची नव्याने आवक सुरू झाल्याने नदी पात्रात ४ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पातळी प्रत्येक तासाला तपासली जात आहे़ अधुनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत़ २६ हजार द.ल.घ.फू. पाण्याचा साठा कायम ठेऊन आलेले पाणी नदी पात्रात सोडले जात आहे़ पावसाची शक्यता लक्षात घेता नदी कठावरील गावक-यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-शामराव बुधवंत मुळा धरण अभियंता, राहुरी.