रासायनिक फवारणी करून कलिंगड पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:25+5:302021-03-04T04:37:25+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील राहुल बारगुजे यांच्या कलिंगड पिकावर रासायनिक द्रव्याची फवारणी करून नुकसान केले. या ...
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील राहुल बारगुजे यांच्या कलिंगड पिकावर रासायनिक द्रव्याची फवारणी करून नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि. १) अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. कृषी विभागाच्या पथकाने भेट देऊन या घटनेला दुजोरा दिला आहे. रासायनिक द्रव्याचा प्रकार शोधण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे कलिंगड नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
घोटवी येथील राहुल बारगुजे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फुलविणाऱ्या तरुणाने सोळा गुंठ्यांमध्ये कलिंगडाची लागवड केली. त्यामध्ये मिरचीचे आंतरपीक घेतले. ५० दिवसांत कलिंगडाची अपेक्षित वाढ झाली होती. भरघोस उत्पादन मिळण्याची आशा असताना, सोमवारी नियमितपणे शेतात गेलेल्या राहुल यांना कलिंगडांचा प्लाॅट सुकून गेल्याचे दिसल्यामुळे धक्का बसला. हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी रासायनिक द्रव्याची फवारणी करून हिरावून घेतला होता. कलिंगड पिकासाठी घेतलेले कष्ट आणि खर्च पीक नष्ट झाल्यामुळे वाया गेला आहे. नेमका प्रकार शोधण्यासाठी राहुल बारगुजे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कृषी विभागाला कळविल्यानंतर मंगळवारी कृषी पर्यवेक्षक विजय त्रंबके, कृषी साहाय्यक चंद्रशेखर कलंगुडे यांनी कलिंगडांची पाहणी करून पानांचा नमुना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठविला आहे.