निवडणूक प्रशिक्षणाला दांडी : 87 कर्मचा-यांवर होणार फौजदारी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 04:18 PM2019-04-07T16:18:35+5:302019-04-07T16:19:35+5:30
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली.
श्रीगोंदा : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली.
लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी श्रीगोंदा मतदारसंघातील सुमारे 2048 अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण श्रीगोंदा येथे देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा पहीला टप्पा आज पूर्ण झाला. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन उपस्थित होते.
श्रीगोंदा येथे एकूण 345 मतदान केंद्रासाठी 2048 अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचारयांचे पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण आज घेण्यात आले. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. ही सर्व उपकरणे व्यवस्थित हाताळता यावी, त्याचबरोबर निवडणूक विभागाच्या नियमानुसार मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाचे नियम त्यांना माहित असणे आवश्यक आहे. मतदानादरम्यान निवडणूक योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी कर्मचा-यांनाच पार पाडावी लागते. त्यामुळे निवडणुकीच्या कामावर नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचा-याला प्रशिक्षण देणे आवश्यक राहते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजय मोरे यांनी यंदा निवडणुक प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
परंतु अनेक कर्मचा-यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली. अशा दांडीबहाददर 87 कर्मचा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांच्यावर बडतर्फीचीही कारवाई करण्याचा इशारा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील निवडणुक विभागाने दिली आहे.