काविळीच्या साथीचा धोका
By Admin | Published: September 5, 2014 11:36 PM2014-09-05T23:36:53+5:302014-09-05T23:48:25+5:30
अहमदनगर : शहरातील काविळीची साथ जिल्ह्यात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अहमदनगर : शहरातील काविळीची साथ जिल्ह्यात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यात काविळीचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार केलेल्या पाहणीत त्या ठिकाणी दोन रुग्ण स्थानिक असून उर्वरित स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
कर्जत तालुक्यात काविळीचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषदेला मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांचे पथक कर्जतला पाठविले. त्यांनी त्या ठिकाणी कावीळ साथीची माहिती घेतली. तसेच रुग्णांची पाहणी केली.
डॉ. सांगळे यांच्या माहितीनुसार कर्जत शहरात काविळीचे सहा रुग्ण असल्याची माहिती मिळाली होती. प्रत्यक्षात शुक्रवारी त्यांनी स्वत: केलेल्या पाहणीत प्रत्यक्षात अवघे २ रुग्ण आढळले असून अन्य रुग्ण स्थलांतरित असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाने कर्जत शहरात घरोघरी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे.
कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा आणि ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा विभाग यांना पाणी शुध्दीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नगर शहरातील काविळीचा साथीचा धोका जिल्ह्यात पसरण्याचा धोका आहे. नगर शहरात काविळी सोबत डेंग्यूचे रुग्ण वाढले असून आतापर्यंत डेंग्यूची लागण झाली असल्याचे दहा रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)