परीक्षा केंद्रांवर दंगलसदृश परिस्थिती : पंधरा मिनिटात प्रश्नपत्रिका झेरॉक्स सेंटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:45 AM2019-03-02T11:45:37+5:302019-03-02T11:45:47+5:30
शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षांचा दावा केला जात असला तरी पाथर्डी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रच कॉपी पुरविणाऱ्या एजंटांनी हायजॅक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला़
पाथर्डी : शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षांचा दावा केला जात असला तरी पाथर्डी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रच कॉपी पुरविणाऱ्या एजंटांनी हायजॅक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला़ कॉपी पुरविणाऱ्यांमुळे परीक्षा केंद्रांवर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली़ काही पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ झाल्याचे प्रकार घडले़ मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे़
तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षा केंद्रांवर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांकडून व त्यांच्यासाठी कॉपी पुरविणाºया एजंटांची परीक्षा केंद्रांवर सर्रास गुंडगिरी सुरु आहे़ दोन दिवसापूर्वी सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आलेल्या तनपुरवाडी येथील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी भरारी पथकाने तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले़ त्यांच्याकडील पेपर ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा नवीन पेपर सोडविण्यासाठी देण्यात आला़
बाबूजी आव्हाड विद्यालय, वृद्धेश्वर हायस्कूल (तिसगाव), दादापाटील राजळे कॉलेज (आदिनाथनगर), नवनाथ विद्यालय (करंजी), रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मोहटे), एम. एम. निºहाळी विद्यालय, संत भगवानबाबा कला व विज्ञान विद्यालय (खरवंडी), तिलोक जैन विद्यालय, वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, रत्न जैन विद्यालय (माणिकदौंडी), महात्मा गांधी विद्यालय (येळी), आनंद विद्यालय (शिराळ) या परीक्षा केंद्रांवर दहावीसाठी ४ हजार ७३१ व बारावीचे ५ हजार ७३१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शहरातील एस. एम. निºहाळी विद्यालयात पोलिसांनी शुक्रवारी चोख बंदोबस्त ठेवला होता़ परंतु कॉपी देण्यास विरोध केल्याने एका युवकाने पोलीस शिपाई संदीप गर्जे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली़ तर एक महिला व तिच्यासोेबतच्या पुरुषाने कॉपी पुरविण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरुन पोलीस कर्मचाºयास शिव्यांची लाखोली वाहिली तसेच सर्वांसमक्ष विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली़ त्यामुळे पोलिसांनीही माघार घेतल्याचे पहायला मिळाले़ पेपर सुरु होऊन अवघ्या पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिका शहरातील झेरॉक्स सेंटरवर आली़ उत्तर पत्रिका तयार करुन ती परीक्षा केंद्रावर पोहचवण्यासाठी तरुणांची मोटार सायकलवर धावपळ सुरु होती.
परीक्षा केंद्रांवर परीक्षा काळात जमाव बंदी लागू असतानाही कॉपी पुरविणाऱ्यांच्या झुंडींचा आरडाओरड व पळापळीमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली़ काही परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविणाºया युवकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला.
परीक्षा केंद्रांवर बाहेरील कॉपी पुरविणाºया युवकांनी खिडकीतून व दरवाजातून दगडात कॉपी बांधून फेकल्याने दगड लागून काही परीक्षार्थी जखमी झाले.
मराठीच्या पेपरलाही कॉपी
टाकळी मानूर येथील भवानी माता विद्यालयात दहावीच्या पहिल्याच मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणावर कॉपी झाली़ मात्र, पथकातील सदस्यांना ती कॉपी दिसली नाही़ येथे बंदोबस्तासाठी फक्त दोनच पोलीस कर्मचारी होते़ पोलिसांनी तळमजल्यावर कॉपी देण्यास मज्जाव केल्याने कॉपी पुरविणाºयांनी शेजारील इमारतीवर चढून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळविला़ त्यानंतर थेट परीक्षा खोलीत जाऊन विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्या. मात्र, त्यावर पर्यवेक्षक, केंद्र प्रमुखांनीही आक्षेप घेतला नाही़