औद्योगिक ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:15+5:302021-04-25T04:20:15+5:30
अहमदनगर : सद्य:स्थितीत देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये ...
अहमदनगर : सद्य:स्थितीत देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आपण वैद्यकीय ऑक्सिजन आणि औद्योगिक ऑक्सिजनमधील फरक जाणून घेण्याची गरज आहे. या परिस्थितीवर चेन्नई येथील लिंडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत असणारे अंबादास भापकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी वैद्यकीय आणि औद्योगिकमधील ऑक्सिजनमधील माहिती सविस्तरपणे सांगितली.
.........
प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजे नेमके काय ?
अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजनला मेडिकल ऑक्सिजन असेही संबोधले जाते. वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये उच्च प्रतीची शुद्धता असते. हा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जातो. या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन वायूची उच्च प्रतीची शुद्धता असते. साधारण ९९.५ ते ९९.९ टक्के ही शुद्धता असते.
............
प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन आणि वैद्यकीय ऑक्सिजनमधील फरक काय ?
अंबादास : औद्योगिक ऑक्सिजन आणि वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये खूप मोठा फरक आहे. वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरच्या गळ्याभोवती पांढरा रंग असतो. बाकीचा सिलिंडर काळ्या रंगामध्ये असतो. वैद्यकीय ऑक्सिजन मानवी शरीरात वापरण्यासाठी विकसित केला जातो.
...........
प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजन भरतेवेळी काय काळजी घेतली जाते ?
अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरतेवेळी दुसरा कुठलाही वायू मिसळणार होणार नाही, याची काळजी घेतली जाते. सिलिंडर भरल्यानंतर त्याची शुद्धता तपासली जाते. दूषित होण्यापासून रोखण्यासाठी सिलिंडर भरण्यापूर्वी तपासणी केली जाते. सिलिंडरच्या व्हॉल्व्हमध्ये ग्रीस, ऑईल किंवा केमिकल चिकटले असेल तर ते साफ केले जाते. सिलिंडर भरण्यापूर्वी त्याची Odor test केली जाते. यामध्ये सिलिंडरच्या व्हॉल्व्हची चावी खुली करून वायूच्या वासाची चाचणी केली जाते. वासाची चाचणी करताना कसल्याही प्रकारचा दुर्गंध आला तर तो सिलिंडर फिलिंग विभागातून वेगळा केला जातो. सिलिंडर भरून झाल्यावर योग्य लेबल लावून त्याची नोंद केली जाते.
वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर दूषित पदार्थांपासून मुक्त असणे आवश्यक आहे. इतर कारणांसाठी वापरलेले सिलिंडर वैद्यकीय ऑक्सिजनसाठी वापरले जाणार असतील तर ते रिकामे केले जातात. पूर्णपणे साफ करून त्याला योग्य ते लेबल लावले जाते. त्यानंतर ते सिलिंडर भरले जाते.
............
प्रश्न : वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर नेमका कसा केला जातो ?
अंबादास : वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर विविध ठिकाणी केला जातो. सामान्यत: वैद्यकीय ऑक्सिजन रुग्णालये आणि क्लिनिकसारख्या वैद्यकीय सुविधांमध्ये दिले जाते. हे अनेस्थेसिया दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार, स्वत: श्वास घेऊ शकत नाही अशा रुग्णांना ऑक्सिजन थेरपी दिली जाते. वैद्यकीय ऑक्सिजन वापरण्यासाठी अतिरिक्त आवश्यकता आणि नियम आहेत. ज्यात एखाद्या व्यक्तीस वैद्यकीय ऑक्सिजनची गरज पडल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार ऑक्सिजन योग्य प्रमाणात दिला जातो. रुग्णाची शरीरयष्टी, वय, विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याची गरज असते.
.............
प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन म्हणजे नेमके काय ?
अंबादास : औद्योगिक ऑक्सिजन सिलिंडर हा पूर्ण काळ्या रंगामध्ये असतो. हा ऑक्सिजन औद्योगिक वसाहतीत कटिंग, वेल्डिंगसह इतर रासायनिक प्रक्रियांसह अनेक औद्योगिक कामात वापरला जातो. हा ऑक्सिजन हा मानवी वापरासाठी योग्य नाही. कारण औद्योगिक वसाहतीत विषारी केमिकल, विषारी वायू, धूळ कचरा, ऑईल सिलिंडरमध्ये मिसळण्याचा जास्त धोका असतो. गलिच्छ उपकरणे किंवा औद्योगिक संग्रहालय अशुद्ध असू शकते.
..........
प्रश्न : औद्योगिक ऑक्सिजन हा वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरता येऊ शकतो का ?
अंबादास : औद्योगिक ऑक्सिजनची शुुुद्धता उच्च प्रतीची नसते. सिलिंडरच्या आतमध्ये कचरा, धूळ, अशुुद्ध पाणी, गंंज असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी वापरण्यास योग्य नसतो.
................
प्रश्न : इतर क्षेत्रातही ऑक्सिजनचा वापर केला जातो का ?
अंबादास : हो केला जातो. काही विशिष्ट व्यवसायांसाठी किंवा वापरासाठी लोकांना उच्च-शुद्धता ऑक्सिजनची आवश्यकता असते, असा एक गैरसमज आहे. मात्र, ते खरे नाही. अग्निशामक कर्मचारी, खोल समुद्रातील डायव्हिंग आदींसाठी उच्च शुद्धतेच्या ग्रेड ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. यापैकी बऱ्याच घटनांमध्ये नियमित वातावरणातील शुद्ध हवेचा उपयोग केला जातो.
...............
...............