रात्रीचा अंधार, डबक्यातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:33+5:302021-08-20T04:26:33+5:30
अहमदनगर : पथदिवे बंद असल्याने शहर आधीच अंधरात बुडाले असतानाच पावसाने रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात डबक्यातून ...
अहमदनगर : पथदिवे बंद असल्याने शहर आधीच अंधरात बुडाले असतानाच पावसाने रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात डबक्यातून प्रवास करण्याची वेळ नगरकरांवर ओढावली आहे. नागरिकांचा जीव गेल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यात गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस पडत आहे. या पावसामुळे रस्त्यांतील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अंधारामुळे डबक्यांमधून प्रवास करणे कठीण झाले आहे. मध्यवर्ती शहरातील रस्ते भुयारी गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेले आहेत. मागील आठवड्यात पाऊस नव्हता. त्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याबाबत अमृत योजनेच्या ठेकेदाराला आदेशही देण्यात आले होते; परंतु रस्त्यांची दुरुस्ती तर दूरच; पण ठेकेदार महापौरांनी बोलिवलेल्या बैठकीलाही उपस्थित राहिला नाही. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी रस्त्यांची दुरुस्त न केल्यास अमृतच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी ठेकेदारावर कारवाई करणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. पदाधिकाऱ्यांनाही विसर पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्तीही लांबली. याशिवाय रस्त्यांतील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने निविदाही मागविल्या होत्या; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचेही काम रखडले आहे. या पावसामुळे दिल्लीगेट येथे पाण्याचे तळे साचले होते. तसेच कापड बाजारातील चौकात तब्बल सात फुटांचा खड्डा पडला आहे. सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, नालेगाव, केडगाव, बुरुडगाव आदी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अंधारात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडल्या; परंतु महापालिकेकडून मात्र याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
...
कापड बाजारात खड्ड्याला पुष्पहार
कापड बाजारातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्याला सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून निषेध व्यक्त केला. यावेळी प्रणव बोगावत, कुणाल भंडारी, सुरेश राजपुरोहित, गणेश पुटटा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
....
सूचना फोटो: १९ कापड बाजार नावाने आहे.