नान्नज, मोहरी येथे भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:20+5:302021-02-16T04:22:20+5:30
जामखेड : तालुक्यातील नान्नज येथे जामखेड-करमाळा रस्त्यावर पोलीस दूरक्षेत्राशेजारीच राहणारे शंकर कल्याण गाडेकर यांच्या घराचे भरदिवसा कुलूप तोडून कपाटातील ...
जामखेड : तालुक्यातील नान्नज येथे जामखेड-करमाळा रस्त्यावर पोलीस दूरक्षेत्राशेजारीच राहणारे शंकर कल्याण गाडेकर यांच्या घराचे भरदिवसा कुलूप तोडून कपाटातील सहा तोळ्याचे दागिने, दहा हजारांची रोकड असा एकूण एक लाख चोवीस हजारांचा ऐवज लंपास केला. असाच प्रकार तालुक्यातील मोहरी गावातही घडला. येथील कांतीलाल गोपाळघरे यांच्या घराचे कुलूप तोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह काही रोकड असा ४ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याबाबत जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नान्नज येथील कल्याण गाडेकर यांचे कुटुंबीय ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सहा तोळ्याचे दागिने, दहा हजारांची रोकड असा एक लाख चोवीस हजारांचा ऐवज चोरीस गेला. सायंकाळी सहाच्या सुमारास गाडेकर कुटुंब शेतातून परत घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कल्याण गाडेकर यांचा मुलगा हनुमंत गाडेकर याने जामखेड पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब तागड, विजय सुपेकर पुढील तपास करीत आहेत. दुसरा प्रकार तालुक्यातील मोहरी येथे घडला. कांतीलाल गोपाळघरे हे सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. दुपारी घरी आल्यावर पाहिले असता कपाट उचकटून कपड्याची उचकापाचक केलेली आढळून आली. कपाटातील ४ लाख ६५ हजार रुपयांचे सोने, चांदी, रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले.