कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे दिवासाआड पाणी

By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:32+5:302020-12-05T04:33:32+5:30

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम ...

Daytime water due to inefficient distribution system | कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे दिवासाआड पाणी

कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे दिवासाआड पाणी

अहमदनगर : मुळा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी कुचकामी वितरण व्यवस्थेमुळे नगरकरांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावर कळस असा की, केडगाव व कल्याण रोड परिसरात पाच ते सहा दिवसांनी पाणी येते.

नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होताे. यंदा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २६ हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण पूर्ण भरले होते. तसेच जायकवाडी धरणातही पाणी सोडण्यात आले होते. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला दरराेज पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने वितरण व्यवस्था सक्षम बनविण्याकडे सातत्याने दर्लक्ष केले. त्यात शहरातील लोकवस्ती वाढल्याने हद्दवाढीतील भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधींच्या पाणी योजना सुरू होऊन बराच काळ लोटला. परंतु, पाणीयोजना कार्यान्वित झालेल्या नाहीत.

मुळा धरणातून पाणीउपसा करून हे पाणी विळदघाट येथील उपकेंद्रात साठविले जाते. तेथून ते वसंत टेकडी येथील जलकुंभात साेडले जाते. वसंतटेकडी येथे ७० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आहे. या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा होताे. शहरात जुने २० जलकुंभ आहेत. शहर सुधारित पाणी योजनेंतर्गत नव्याने ८ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तसेच अमृत योजनेंतर्गत मुळा धरणातून नव्याने ३५ कि. मी. ची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे कामही अधर्वट असल्याने शहराला जुन्या जलवाहिनीतूनच पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी जुनी झाल्याने तिला गळती लागली आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून, नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

.....

प्रतिमानसी ८० लिटर पाणी

शहरातील प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी द्यावे, असा संकेत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातूनही पुरेसे पाणी आहे. सन २०११ च्या जनगणेनुसार ३ लाख ५० हजार इतकी शहराची लोकसंख्या आहे. प्रत्येक व्यक्तीला सध्या ८० लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

....

२० टक्के पाणी गळती

मुळा धरण ते वसंतटेकडी हे अंतर ३५ कि.मी. इतके आहे. या मार्गावर २० टक्के पाण्याची गळती सुरू आहे. मुळा धरणातून उपसा केलेल्या पाण्यापैकी ८० टक्केच पाणी शहराला मिळते.

.....

फेज-२ ११६ कोटींवरून १२३ कोटींवर

शहराच्या पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन सन २०१० मध्ये शासनाने फेज-२ योजना मंजूर केली. सुमारे ११६ कोटींची ही योजना होती. मात्र, वेळेत पूर्ण न झाल्याने सदर योजना १२३ कोटींवर पोहोचली आहे.

.....

फेज-२ ला सात वर्षांची मुदतवाढ

शासनाने मंजूर केलेल्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सन २०१० मध्ये सुरू झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी २०१३ पर्यंत मुदत होती. परंतु, सदर योजना मुदतीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे २०१३ ते २०२० या काळात वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. सात वर्षे उलटूनही ही योजना पूर्ण झाली नाही.

....

चाचणीविना नळजोडणी लांबणीवर

शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात ५६५ कि.मी. भूमिगत पाईप टाकण्यात आले आहेत. परंतु, या पाईपची चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेतून नळजोडणी देण्यात आलेली नाही.

....

दुसऱ्या अमृत पाणी योजनेची मुदतही संपली

केंद्र शासनाने अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. सुमारे १०० कोटी खर्चून मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंत ३५ कि. मी. ची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत २२ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

....

- शहर सुधारित पाणीपुवठा व अमृत योजना येत्या मार्चपर्यंत पूर्ण हाेतील. विळघाट येथे वीज उपलब्ध होण्यासाठीची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराला उन्हाळ्यात दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

- गणेश गाडळकर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा

Web Title: Daytime water due to inefficient distribution system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.